सात जागांवर काँग्रेसला विनाअट पाठींबा देण्यास ‘वंचित’ तयार - प्रकाश आंबेडकर
By संतोष येलकर | Published: March 19, 2024 07:12 PM2024-03-19T19:12:50+5:302024-03-19T19:16:17+5:30
सात जागांवर काँग्रेसला विनाअट पाठींबा देण्यास वंचित बहुजन आघाडी तयार आहे.
अकोला: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महाविकास आघाडीच्या जागावाटपात काँग्रेसच्या वाट्याला येणाऱ्या जागांपैकी सात जागांवर काँग्रेसला विनाअट पाठींबा देण्यास वंचित बहुजन आघाडी तयार आहे. त्यासाठी संबंधित सात जागांची यादी काँग्रेसने ’वंचित’कडे पाठवावी, अशा प्रस्तावाचे पत्र काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पाठविले आहे, अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश उपाख्य बाळासाहेब आंबेडकर यांनी मंगळवारी येथे दिली.
राज्यात महाविकास आघाडीतील जागावाटपात १० जागांवर काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट आणि ५ जागांवर राष्ट्रवादी काॅंग्रेस शरद पवार गट, काँग्रेस व शिवसेना ठाकरे गट यांच्यात रस्सीखेच सुरु आहे. महाविकास आघाडीतील संबंधित तीन घटक पक्षांचे जागावाटप निश्चित होत नसतानाच लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील जागावाटपात काँग्रेसच्या वाटयावर येणाऱ्या जागांपैकी सात जागांची यादी काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीकडे पाठवावी, संबंधित सात जागांवर वंचित बहुजन आघाडी विनाअट काॅंग्रेसला पाठींबा देण्यास तयार असल्याचा निर्णय ‘वंचित’ ने घेतला आहे.
पक्षाने मांडलेल्या या प्रस्तावाचे पत्र मंगळवारी दुपारीच काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खरगे यांना पाठविण्यात आल्याचे आंबेडकर म्हणाले. यासंदर्भात महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गट यांच्याबाबत कोणताही निर्णय घेतला नसून, जिंकणाऱ्या सात जागांची यादी काँग्रेसने ‘वंचित’ला द्यावी, त्या जागांवर पक्ष काँग्रेसला पाठींबा देणार आहे. त्यासाठी कोणतीही अट व शर्त ठेवण्यात आली नाही, असेही आंबेडकर यांनी स्पष्ट केले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डाॅ.धैयर्वधन पुंडकर, जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, मिलींद इंगळे, बालमुकुंद भिरड, गजानन गवइ, विकास सदांशिव, पराग गवइ आदी उपस्थित होते.
महाविकास आघाडीत १५ जागांवर ताळमेळ नाही!
महाविकास आघाडीतील काॅग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गट या घटक पक्षांतील जागावाटपात १५ जागांवर अद्यापही ताळमेळ नाही, असे सांगत आम्ही कोणालाही सोडले नसून, काँग्रेसला सात जागांवर पाठींबा देण्याची भूमिका पक्षाने घेतल्याचेही आंबेडकर यांनी स्पष्ट केले.
मविआने तीनदा ३ जागांचा दिलेला प्रस्ताव फेटाळला
राज्यातील जागावाटपात महाविकास आघाडीने तीनदा तीन जागांचा दिलेला प्रस्ताव वंचित बहुजन आघाडीने फेटाळला आहे, असे आंबेडकर यांनी स्पष्ट केले.
युतीसाठी शेवटपर्यंत दरवाजे उघडेच
महाविकास आघाडीत आमचा कोणी विश्वासघात केला नाही आणि आम्ही कोणाचा विश्वासघात केला नाही, असे सांगत महाविकास आघाडीसोबत युतीसाठी शेवटच्या क्षणापर्यंत आमचे दरवाजे उघडेच आहेत, असेही आंबेडकर यांनी सांगितले.