- संजय उमक लोकमत न्यूज नेटवर्कमूर्तिजापूर : तालुक्यातील आपत्ती निवारणासाठी शासन स्तरावरून मूर्तिजापूर उपविभागासाठी तीन वर्षांपूर्वी आपत्ती निवारण साहित्य पुरविण्यात आले होते; परंतु तेव्हापासून एकदाही वापर न झालेले साहित्य मात्र आता तहसील कार्यालयातील जुन्या जेल खान्यात बंदिस्त असून, धूळ खात पडले आहे.नैसर्गिक आपत्ती, संकटापासून नागरिकांचे संरक्षण व बचाव व्हावा, त्यांना सर्व बाबींची माहिती उपलब्ध व्हावी, या दृष्टीने तहसील स्तरावर नैसर्गिक आपत्ती हा खास कक्ष आहे. बहुतेक पावसाळ्याच्या दिवसांत येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीपासून नागरिकांचा बचाव करण्याच्या साहित्याचा समावेश आहे. यामध्ये १ मेगा फोन, १ सर्च लाइट, १ हेल्मेट, १ बोट, १ बोट फ्रेम, १ बोट इंजीन, १५ लाइफ जॅकेट व ५ रिंग इत्यादी साहित्याचा समावेश आहे. सर्व साहित्य धूळ खात पडले असल्याने उंदराच्या तडाख्यात सापडले आहे. हे सर्व साहित्य सुरक्षित असेल का, हेही औत्सुक्याचे ठरले आहे. आपत्कालीन काळात नागरिकांच्या सुरक्षेसाठी येणारे साहित्यच सुरक्षित नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. सर्व साहित्य धुळीने माखलेले असून, पूर्वी जेथे गुन्हेगारांना अथवा आरोपींना बंदिस्त ठेवल्या जायचे, तिथे आता उपरोक्त साहित्य बंदिस्त आहे.
मूर्तिजापुरातील आपत्ती निवारण साहित्य तीन वर्षांपासून जेलखान्यात बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 3:00 PM