अकोला : मराठा आरक्षणासाठी समाजातील मंत्री, खासदार व आमदार, आदी लोकप्रतिनिधींनी आवाज उठविला पाहिजे, असे आवाहन करीत राज्य विधिमंडळाच्या दोन दिवसीय अधिवेशनात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करा, अशी मागणी छत्रपती संभाजीराजे यांनी केली.
मराठा समाज जनसंपर्क दौरा अंतर्गत सकल मराठा समाज अकोला जिल्हा शाखेच्या वतीने रविवारी अकाेला शहरातील मराठा मंगल कार्यालयाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कोरोना संसर्गाच्या परिस्थितीत मराठा आरक्षणासाठी रस्त्यावर उतरून लढाई लढण्याची ही वेळ नसून, मराठा आरक्षणासाठी आता कायद्याची लढाई लढणे गरजेचे आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मागासवर्गीय आयोग नेमणे हाच आता पर्याय असून, त्यासाठी भोसले समितीच्या सूचना राज्यपालांकडे सादर करण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. त्यानंतर यासंदर्भात राज्य सरकारने केंद्र सरकारकडे प्रस्ताव सादर करावा आणि केंद्र सरकारने राष्ट्रपतींकडे प्रस्ताव सादर करून वटहुकूम काढावा, असे संभाजीराजे यांनी सांगितले. मराठा आरक्षण हा वादाचा नाही, तर पर्यायाचा विषय आहे. त्यामुळे अधिवेशन हे दाेन दिवसांचे असले, तरी किमान दाेन तास चर्चा करायला हरकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर समाजातील लोकप्रतिनिधींनी बोलले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी करण गायकर, अंकुश कदम, विनोद साबळे, विलास पांगारकर, गंगाधर काळकुटे, विश्वनाथ वाघ, आप्पासाहेब कुडेकर, रमेश केरे यांच्यासह स्वागताध्यक्ष कृष्णा अंधारे, विनायकराव पवार विचारपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वागताध्यक्ष कृष्णा अंधारे यांनी, तर संचालन व आभारप्रदर्शन ॲड संतोष गावंडे, पूजा काळे यांनी केले. या कार्यक्रमाला सकल मराठा समाज जिल्हा शाखेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.