लोकसभा उमेदवारीसाठी काँग्रेसच्या संभाव्य नावांवर शुक्रवारी चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2018 03:24 PM2018-11-10T15:24:40+5:302018-11-10T15:28:58+5:30
अकोला- अकोला लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या स्थितीबाबत शुक्रवार, १६ नोव्हेंबर रोजी मुंबईत आढावा घेतला जाणार आहे.
अकोला- अकोला लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या स्थितीबाबत शुक्रवार, १६ नोव्हेंबर रोजी मुंबईत आढावा घेतला जाणार आहे. काँग्रेसचे महाराष्टÑ प्रदेश प्रभारी मल्लिकार्जुन खारगे यांच्या उपस्थितीत ही आढावा बैठक होऊ घातली आहे.
काँग्रेसने लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. या अनुषंगाने महाराष्टÑातील सर्व लोकसभा मतदारसंघाचा प्रदेशनिहाय १५ नोव्हेंबरपासून आढावा घेतला जाणार आहे. १६ नोव्हेंबरला विदर्भातील मतदार संघांवर सकाळी १०.३० ते १.३० वाजेपर्यंत चर्चा होणार आहे. अकोला लोकसभा मतदारसंघाबाबतही यावेळी चर्चा होईल. या मतदारसंघात विधानसभेचे पाच मतदारसंघ समाविष्ठ आहेत; मात्र यापैकी एकाही ठिकाणी काँग्रेसचा आमदार नाही. या लोकसभा मतदारसंघात गेल्या वेळी नेमकी काय स्थिती होती, किती मतांनी पराभव झाला, त्यानंतरच्या साडेचार वर्षात पक्षांतर्गत काय बांधणी झाली, आज तेथे पक्षाची स्थिती काय, विजयाचे गणित काय राहू शकते, अशा विविध मुद्यांवर या बैठकीत चर्चा होणार आहे. यावेळी संभाव्य उमेदवारांच्या नावाबाबतही चर्चा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा मतदारसंघ भारिप-बमसंला का सोडावा, या मुद्यावरही १६ नोव्हेंबरच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.