तेल्हारा : तालुक्यातील एका मोठ्या पदावर असलेला अधिकारी काम करून देत असताना, रजिस्टरमध्ये ५०० रुपये स्वीकारत असताना एका व्यक्तीने शूटिंग केलेल्या व्हिडीओची चर्चा सर्वत्र होत असून, त्या अधिकाऱ्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या व्हिडीओच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
तालुक्यातील एका अधिकाऱ्याकडे काही महिन्यांपासून महत्त्वाचा पदभार आहे. त्यामुळे या अधिकाऱ्याने काम करून देत असताना ‘नवा गडी, नवा राज’ ही संकल्पना लागू करून काम करून देण्याचा अजब फंडा सुरू केला. काम हाताेहात करीत असल्याने वसुलीसुद्धा हाताेहात झाली पाहिजे. पण, हात न लावता... त्यामुळे या अधिकाऱ्याने नवीन शक्कल लढवत टेबलवर असलेल्या रजिस्टरमध्ये प्रत्येकी ५०० ची नोट टाकावी, असा फतवा जारी केला. त्यामुळे दर महिन्याला ज्यांना या अधिकाऱ्याकडे जावे लागते, त्यांना हा नियम लागू असल्याने अनेक महिन्यांपासून या अधिकाऱ्याचा कारभार सुरू असल्याची आतल्या गोटातून चर्चा आहे. मात्र, हा प्रकार एका व्यक्तीने मोबाइलमध्ये कैद केला असून, त्याची शूटिंग काढली आहे. त्यामुळे जे पाचशे देतात ते पुढील काम करण्यास मोकळे असल्याने ते सुद्धा पाचशेचे पाच हजार करण्यास मागे-पुढे पाहत नसल्याने यात नुकसान जनतेचे, परिणामी शासनाचेसुद्धा होत आहे. याबाबत याच खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याशी संपर्क साधला असता त्यांनीसुद्धा या व्हिडीओबाबत चर्चेला दुजोरा दिला आहे. मात्र,अद्याप तक्रार दाखल झाली नसल्याने कारवाई करण्यात आली नाही, अशी माहिती आहे.