अकोला: अकोट फैल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी असलेल्या एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून तिला शिवीगाळ केल्याप्रकरणी एका २६ वर्षीय आरोपीस जिल्हा व सत्र न्यायाधीश मोनिका आर्लेंड यांच्या न्यायालयाने गुरुवारी पाच वर्षांची शिक्षा ठोठावली. यासोबतच २२ हजार रुपये दंडही ठोठावण्यात आला असून, दंड न भरल्यास अतिरिक्त शिक्षेचे प्रावधान न्यायालयाने केले आहे.अकोट फैलमधील एक अल्पवयीन मुलगी तिच्या घरी झोपलेली असताना विकास महादेव गायकवाड रा. अकोला हा आरोपी तिच्या घरात घुसला. त्यानंतर मुलीचा विनयभंग करून शिवीगाळ केली. मुलीने विरोध केल्यानंतर आरोपी घरातून पळून गेला. त्यानंतर मुलीच्या तक्रारीवरून अकोट फैल पोलिसांनी आरोपी विकास गायकवाड याच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३५४, ४५२, ५०४ तसेच पॉस्को कायद्याच्या कलम ८ अन्वये गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास अकोट फैल पोलिसांनी करून दोषारोपपत्र जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केले. न्यायालयाने याप्रकरणी सहा साक्षीदार तपासले. त्यानंतर जिल्हा व सत्र न्यायाधीश मोनिका आर्लेंड यांच्या न्यायालयाने आरोपीस कलम ४५२ अन्वये दोषी ठरवित पाच वर्षांची शिक्षा तसेच दहा हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिने आणखी शिक्षा, कलम ५०४ अन्वये दोन वर्षांची शिक्षा तसेच दोन हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना आणखी शिक्षा तसेच पॉस्को कायद्याच्या कलम ८ अन्वये पाच वर्षांची शिक्षा तसेच दहा हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिने आणखी शिक्षा न्यायालयाने ठोठावली. या तीनही शिक्षा आरोपीला सोबत भोगायच्या आहेत. याप्रकरणी सरकार पक्षाच्यावतीने अॅड. राजेश अकोटकर यांनी कामकाज पाहिले. या एकाच महिन्यात अकोटकर यांनी बाजू मांडलेल्या तीन प्रकरणांत आरोपींना शिक्षा झालेली आहे.