अकोला - अनुदानासाठी पात्र असलेल्या राज्यातील विनाअनुदानित शाळांची पुनर्तपासणी करण्यासाठी नेमलेल्या त्रयस्थ समित्या शिक्षण विभागाने मंगळवारी बरखास्त केल्या. त्यामुळे राज्यातील हजारो शिक्षकांना दिलासा मिळाला आहे. राज्यातील प्राथमिक व माध्यमिक विनाअनुदानित शाळांना अनुदान तत्त्वावर आणण्यासाठी राज्य शासनाच्याच आदेशानंतर शिक्षण विभागातील अधिकार्यांनी शाळांची तपासणी करून त्याचे अहवाल शिक्षण उपसंचालकांमार्फत शिक्षण विभागाकडे सादर करण्यात आले होते. मात्र, यामध्ये काही अधिकार्यांच्या तपासणीवरच आक्षेप घेण्यात आल्याने शिक्षण विभागाने या शाळांची फेरतपासणी करण्यासाठी त्रयस्थ समित्या नेमून तपासणी सुरू केली होती. या प्रकारामुळे शिक्षण विभागातीलच अधिकार्यांवर शिक्षण विभागाचाच विश्वास नसल्याचे समोर आल्याने. तसेच समित्यांची तपासणी रात्री, अवेळी सुरू होत असल्याने शिक्षक, मुख्याध्यापक व कर्मचार्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे अमरावती विभागाचे शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे यांनी नागपूर अधिवेशनात या समित्या बरखास्त करण्याची मागणी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे केली होती. मात्र, त्यावेळी शासनाने या विषयाला बगल दिली होती. अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्येही आ. देशपांडे यांनी हा मुद्दा लावून धरल्यानंतर शिक्षणमंत्री तावडे यांनी या समित्या लवकरच बरखास्त करण्याची ग्वाही दिली होती. त्यानुसार शिक्षण विभागाचे उपसचिव राजेंद्र पवार यांनी मंगळवारी शाळा तपासणीसाठी नेमलेल्या त्रयस्थ समित्या बरखास्त करण्याचा आदेश दिला आहे. यासंदर्भात आमदार श्रीकांत देशपांडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी विनाअनुदान तत्त्वावरील शाळांना अनुदान देण्यासाठी शिक्षणाधिकार्यांनी तपासणी करून आधीच अहवाल सादर केले आहेत. मात्र त्यानंतर त्रयस्थ समितीकडून तपासणी करण्यात येत असल्याने शिक्षण विभागातील अधिकार्यांवरच संशय निर्माण करण्यात आला होता. नागपूर आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर या समित्या बरखास्त करण्यात आल्या असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
*दोनवेळा घोषणेनंतरही तपासणी सुरूच
शाळा तपासणीसाठी नेमलेल्या त्रयस्थ समित्या बरखास्त करण्याची घोषणा शिक्षणमंत्री तावडे यांनी दोनवेळा केली होती; मात्र त्यानंतरही या समित्यांकडून शाळा तपासणीचे कामकाज सुरूच होते. हा मुद्दा आ. श्रीकांत देशपांडे यांनी पुन्हा लावून धरल्यानंतर मंगळवारी या समित्या बरखास्त करण्यात आल्या.