अकोला : कौलखेड येथील रहिवासी तसेच पोलिस खात्यातून साहायक पोलिस निरीक्षक पदावरुन सेवानिवृत्त झालेले श्रीराम कजदन गावंडे यांच्यासह त्यांची पत्नी भाजपाच्या माजी महापौर सुमन गावंडे आणि त्यांच्या तीन मुलांविरुध्द अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने रविवारी रात्री उशीरा बेहीशेबी मालमत्ता गोळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. गावंडे कुटुंबीयांकडे एक कोटी ५२ लाख २२ हजार ८९४ रुपयांची मालमत्ता बेहीशेबी असल्याचे एसीबीने केलेल्या तपासात समोर आले आहे.सेवानिवृत्त साहायक पोलिस निरीक्षक श्रीराम कजदन गावंडे यांच्या सेवेच्या कार्यकाळातील परिक्षण कालावधीत (म्हणजेच नोकरी करीत असतांना ज्या वेळेत अवैध मार्गाने मोठया प्रमाणात संपत्ती गोळा केली तो कालावधी) सुमारे एक कोटी ५२ लाख २२ हजार ८९४ रुपयांची बेहीशेबी मालमत्ता गोळा केल्याचे अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलल्या तपासात समोर आले आहे. ही टक्केवारी सुमारे ३८५.६५ टक्के अधिक असल्याचे समोर आले आहे. या दरम्यान श्रीराम गावंडे यांच्या कुटुंबातील त्यांच्या पत्नी माजी महापौर सुमन श्रीराम गावंडे, मुलगा प्रविण श्रीराम गावंडे, रणजित श्रीराम गावंडे, विक्रम श्रीराम गावंडे यांचा परिक्षण कालावधीतील खर्च आणि उत्त्पन्न यामध्ये प्रचंड तफावत असल्याचेही एसीबीच्या तपासात समोर आले आहे. त्यामुळे एसीबीने गावंडे कुटुंबीयांना ही संपत्ती बेकायदेशीर नसल्याचे सिध्द करण्यासाठी संधी दिली होती. मात्र गावंडे कुटुंबीय हे सिध्द करण्यास अपयशी ठरल्याने त्यांच्याविरुध्द अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बेकायदेशीर अपसंपदा गोळा केल्याप्रकरणी श्रीराम गावंडे, सुमन गावंडे, प्रविण गावंडे, रणजीत गावंडे, विक्रम गावंडे यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या कलम 13 (1) (ई) 13 (2) अन्वये तसेच भारतीय दंड विधानाच्या कलम १०९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक डोंगरदिवे, पोलीस उपअधीक्षक गजानन पडघन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संतोष शेगावकर, प्रमोद धानोरकर, सतिष कीटूकले करीत आहेत.
बेहिशेबी मालत्ता; अकोल्याच्या माजी महापौरासह कुटुबियांविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2019 12:56 PM