अकाेला : महापालिका व नगरपालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग रचना ठेवायची की, वार्ड यासंदर्भात सत्ताधारी महाविकास आघाडीतच वादंग सुरू झाला आहे. दुसरीकडे वार्डनिहाय निवडणुका हाेतील, असे आधी जाहीर केल्याने अनेकांच्या पालिकेत प्रवेश करण्याच्या आशा पल्लवित झाल्या हाेत्या, त्या आता गुरूवारच्या निर्णयामुळे पुन्हा काेमेजल्या आहेत. त्यामुळे प्रभाग की वार्ड, या गाेंधळात कार्यकर्त्यांनी तयारी करायची तरी कधी, असा प्रश्न उपस्थित हाेऊ लागला आहे.
फेब्रुवारी २०२२मध्ये पार पडणाऱ्या महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयाेगाने बहुसदस्यीय प्रभाग रचनेऐवजी एक वार्ड, एक सदस्य या नवीन रचनेला मंजुरी दिली हाेती. त्यामुळे मातब्बरांची धाकधूक वाढली आहे. नवीन वार्ड रचनेमुळे बंडखाेरांना बळ मिळणार असून, काॅंग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादीसह वंचित बहुजन आघाडीला सुगीचे दिवस येण्याची चिन्हे हाेती. मात्र, हा निर्णय बदलल्याने आता पुन्हा प्रभागाच्या सदस्यत्त्वावरून वाद सुरू झाला आहे.
यंदाच्या निवडणुकीत राजकीय पक्षांमध्ये घमासान रंगण्याची चिन्हं असून, भाजपच्या गाेटात अस्वस्थता पसरल्याचे बाेलले जात आहे.
आगामी चार महिन्यांवर येऊन ठेपलेल्या महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे इच्छुकांना वेध लागले आहेत. सप्टेंबर २००१मध्ये मनपाची स्थापना झाल्यानंतर पहिल्या निवडणुकीत मनपावर शिवसेना-भाजपचा झेंडा फडकला हाेता. २००६ - ०७मध्ये सत्तापरिवर्तन हाेऊन काॅंग्रेस व राष्ट्रवादीने अपक्षांच्या मदतीने सत्ता स्थापन केली. २०१२च्या निवडणुकीत भाजपमध्ये बंडखाेरी करणाऱ्या विजय अग्रवाल यांनी भारिप बहुजन महासंघ, काॅंग्रेस व राष्ट्रवादीच्या मदतीने सत्तेच्या चाव्या हातात घेतल्या. त्यावेळी अनुसूचित जातीच्या आरक्षणानुसार भारिपच्या ज्याेत्स्ना गाैतम गवई यांना महापाैरपदी विराजमान करुन स्थायी समितीच्या सभापतीपदाची सुत्रे विजय अग्रवाल यांनी स्वीकारली हाेती. अवघ्या अडीच वर्षांत सत्तेची समीकरणे बदलली अन् सप्टेंबर २०१४मध्ये महापाैरपदाच्या निवडणुकीत भाजप, शिवसेनेने एकत्र येत मनपावर युतीचा भगवा फडकवला. २०१७मधील निवडणुकीत बहुसदस्यीय प्रभाग रचनेचा राजकीय लाभ उचलत भाजपने एकहाती सत्ता स्थापन केली.
अशी आहे महापालिकेतील स्थिती
सन २०१७मध्ये पार पडलेल्या महापालिका निवडणुकांसाठी बहुसदस्यीय प्रभाग रचना हाेती. या निवडणुकीत भाजपा वगळता सर्व राजकीय पक्षांची अक्षरश: वाताहत झाली. ८० सदस्यांपैकी भाजपचे तब्बल ४८ सदस्य निवडून आले. आतापर्यंतचे भाजपाला मिळालेले हे सर्वात माेठे यश ठरले आहे.
...असा हाेऊ शकताे फायदा
एक वार्ड, एक सदस्य प्रभाग रचनेचा काॅंग्रेस, राष्ट्रवादी व वंचित बहुजन आघाडीला फायदा हाेताे, असे आकडे सांगतात, आता पुन्हा तीन सदस्यीय प्रभाग केल्यामुळे भाजपासारख्या उत्तम संघटनात्मक बांधणी असलेल्या पक्षाला लाभ हाेण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
एका मतदाराला द्यावे लागतील तीन मते
महापालिकेत एका प्रभागातून तीन सदस्य निवडून द्यायचे असल्याने एका मतदाराला तीन मते द्यावे लागणार आहेत. नगरपालिकांमध्ये एका प्रभागातून दाेन सदस्य निवडून द्यायचे असल्याने येथे दाेन मते द्यावी लागतील.
दाेन सदस्यांचा प्रभाग मनपासाठी असणे संयुक्तिक हाेते. सरकारच्या निर्णयाबाबत काॅंग्रेस कमिटीने याबाबत ठराव घेऊन आपली भूमिका मांडली आहे.
बबनराव चाैधरी, महानगर अध्यक्ष काॅंग्रेस
जाे काम करताे ताे निवडणुकीत विजयी हाेताे. त्यामुळे प्रभाग रचनाच फक्त फायदेशीर आहे असे नाही, सध्याच्या निर्णयाबाबत नाराजी नाही. मात्र, दाेन सदस्यीय रचना असती तर उत्तम.
राजेश मिश्रा, पश्चिम महानगरप्रमुख शिवसेना