अकोला: सत्ताधारी भाजपने विरोधी पक्षनेता तथा काँग्रेसचे गटनेता साजिद खान पठाण यांना नगरसेवक पदावरून अपात्र करण्याचा प्रस्ताव मंजूर करून राजकीय वर्तुळात बॉम्बगोळा टाकला आहे. भाजपच्या निर्णयामुळे एका दगडात अनेक पक्षी मारल्या जाणार असल्यामुळे इतर राजकीय पक्षांची चांगलीच अडचण झाल्याचे बोलल्या जात आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांमधील जातीय समीकरणे लक्षात घेता येत्या २२ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विशेष सभेत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व भारिप-बहुजन महासंघाच्या भूमिकेकडे अकोलेकरांचे लक्ष लागले आहे.महापालिकेतील विरोधी पक्षनेता साजिद खान यांना नगरसेवक पदावरून अपात्र करण्याचा प्रस्ताव सत्ताधारी भाजपने ५ नोव्हेंबर रोजीच्या सर्वसाधारण सभेत मंजूर केला. मंजूर ठरावावर शासनाने कार्यवाही करावी, यासाठी भाजपने येत्या २२ नोव्हेंबर रोजी मनपात विशेष सभेचे आयोजन केले आहे. भाजपच्या निर्णयामुळे संपूर्ण शहरात राजकीय धुराळा उठला असून, अपात्रतेच्या मुद्यावर सारासार विचार करूनच निर्णय घेतल्याची भाजपच्या गोटात चर्चा आहे. वरवर पाहता साजिद खान यांच्या वर्तणुकीचा मुद्दा उपस्थित केला जात असला तरी यामागे आगामी लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकांचे समीकरण लक्षात घेऊन भाजपने राजकीय खेळी केल्याचे बोलल्या जात आहे. भाजपच्या खेळीमुळे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच भारिप-बहुजन महासंघाच्या गोटात राजकीय घडामोडींना ऊत आला असून, याप्रकरणी सभागृहात भूमिका स्पष्ट करताना संबंधित राजकीय पक्षांचा चांगलाच कस लागणार असल्याचे दिसून येत आहे.मतपेढीला प्राधान्य; राजकीय पक्षांची कोंडीसाजिद खान यांना अपात्र करण्याच्या मुद्यावरून भाजपने इतर राजकीय पक्षांची कोंडी केल्याचे दिसत आहे. अक ोला पश्चिम विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच भारिप-बहुजन महासंघाकडून स्वतंत्र उमेदवार उभा केला जाण्याचे संकेत आहेत. अशा स्थितीत साजिद खान यांच्या अपात्र प्रस्तावाला समर्थन केल्यास मुस्लीम मतदार दुरावण्याची शक्यता राष्ट्रवादी काँग्रेस व भारिप-बमसंच्या गोटातून वर्तविली जात आहे. शिवसेनेने ५ नोव्हेंबर रोजीच्या सर्वसाधारण सभेत भाजपच्या निर्णयाचा विरोध दर्शविला होता. सेनेची हीच भूमिका येत्या २२ नोव्हेंबरच्या विशेष सभेत कायम राहिल्यास हिंदू वोट बँक दुरावण्याची चिन्हे आहेत. भाजप वगळता इतर राजकीय पक्ष अशा विचित्र कात्रीत सापडल्याचे तूर्तास दिसून येत आहे.