संतोष येलकर / अकोलाजिल्ह्यात गतवर्षी झालेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये निवडणूक लढविलेल्या उमेदवारांपैकी निवडणूक खर्च सादर न करणार्या जिल्ह्यातील ३९१ उमेदवारांवर पाच वर्षे निवडणूक लढण्यास अपात्र ठरविण्याची कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी संबंधित उमेदवारांना नोटीस बजावण्यात आल्या असून, शुक्रवार, ३ जूनपासून जिल्हाधिकार्यांकडे सुनावणी घेण्यात येणार आहे.गतवर्षी ऑगस्टमध्ये जिल्ह्यातील अकोला, आकोट, बाळापूर, बाश्रीटाकळी, पातूर, तेल्हारा व मूर्तिजापूर या सातही तालुक्यात २२0 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आल्या. निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर एक महिन्यात निवडणूक लढविलेल्या उमेदवारांनी निवडणुकीचा खर्च संबंधित तहसीलदारांकडे सादर करणे आवश्यक आहे. परंतु, वारंवार सूचना देण्यात आल्यानंतरही जिल्ह्यातील अकोला, आकोट, बाळापूर, बाश्रीटाकळी, पातूर व मूर्तिजापूर या सहा तालुक्यातील ११९ ग्रामपंचायतींच्या निवडणूक लढविलेल्या ३९१ उमेदवारांकडून निवडणुकीचा खर्च सादर करण्यात आला नसल्याचा अहवाल संबंधित तहसीलदारांकडून जिल्हाधिकारी कार्यालयातील ग्रामपंचायत निवडणूक विभागाकडे सादर करण्यात आला आहे. तर तेल्हारा तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा खर्च सादर न करणार्या उमेदवारांचा अहवाल तहसील कार्यालयामार्फत अद्याप सादर करण्यात आला नाही. ग्रामपंचायत निवडणुकीचा खर्च सादर केला नसल्याने, संबंधित उमेदवारांवर पाच वर्षे निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविण्याची कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी संबंधित उमेदवारांना जिल्हाधिकारी कार्यालयातील ग्रामपंचायत निवडणूक विभागामार्फत नोटीस बजावण्यात आल्या आहेत. नोटीस बजावण्यात आलेल्या उमेदवारांची सुनावणी ३ जूनपासून जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात येणार आहे. त्यामध्ये पहिल्या टप्प्यात आकोट तालुक्यातील २0 आणि पातूर तालुक्यातील ३५ उमेदवारांची सुनावणी ३ जून रोजी जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांच्याकडे घेण्यात येणार आहे.
४00 उमेदवारांवर अपात्रतेची टांगती तलवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2016 2:04 AM