लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शहरातील कोरोना संसर्गाचे ‘हॉटस्पॉट’ ठरलेल्या प्रतिबंधित क्षेत्रात शिधापत्रिकाधारकांना घरपोच धान्य वाटप सुरू करण्यात आले; मात्र घरपोच धान्य वाटपासाठी आॅटो व मजूर मिळत नसल्याने दोन दिवसांतच या उपाययोजनेचा बोजवारा उडाला आहे.अकोला महानगरपालिका हद्दीत कोरोना संसर्गाचे ‘हॉटस्पॉट’ ठरलेल्या भागांना प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले. प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांनी घराबाहेर पडू नये, यासाठी या भागातील शिधापत्रिकाधारकांना स्वस्त धान्य दुकानामार्फत घरपोच धान्य पोहोचविण्याचे निर्देश पालकमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी १३ मे रोजी जिल्हा पुरवठा विभागाला दिले होते. त्यानुसार शहरातील प्रतिबंधित क्षेत्रात रास्त भाव दुकानांमार्फत १८ मेपासून घरपोच धान्य वाटपाची उपाययोजना सुरू करण्यात आली; मात्र प्रतिबंधित क्षेत्रात घरपोच धान्य वाटप करण्यासाठी आॅटो चालक व मजूर येण्यास तयार नसल्याने २० मेपासून घरपोच धान्याचे वाटप थांबवून रास्त भाव दुकानांमधून धान्याचे वितरण सुरू करण्यात आले. त्यामुळे शहरातील प्रतिबंधित क्षेत्रात शिधापत्रिकाधारकांना घरपोच धान्य वाटपाच्या उपाययोजनेचा बोजवारा उडाला.पालकमंत्र्यांना निवेदन!शहरातील प्रतिबंधित क्षेत्रात शिधापत्रिकाधारकांना घरपोच धान्याचे वितरण सुरू करण्यात आले; मात्र घरपोच धान्य वितरणासाठी आॅटो व मजूर उपलब्ध होत नसल्याने, रास्त भाव दुकानांमधून धान्याचे वितरण करण्यात येत असल्याचे निवेदन रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेच्यावतीने पालकमंत्री बच्चू कडू यांना गुरुवारी देण्यात आले. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शत्रुघ्न मुंडे, महानगराध्यक्ष योगेश अग्रवाल, अमोल सातपुते, जयंत मोहोड, महेश शर्मा, संजय थावराणी व मोहम्मद आरिफ उपस्थित होते.प्रतिबंधित क्षेत्रात घरपोच धान्य वाटप सुरू करण्यात आले होते; मात्र घरपोच धान्य वाटप करण्यासाठी आॅटो चालक व मजूर येण्यास तयार नसल्याने, प्रतिबंधित क्षेत्रात राष्ट्रवाद दुकानांमधून शिधापत्रिकाधारकांना धान्याचे वितरण करण्यात येत आहे.-बी. यू. काळे, जिल्हा पुरवठा अधिकारीप्रतिबंधित क्षेत्रात शिधापत्रिकाधारकांना घरपोच धान्याचे वितरण करण्यासाठी आॅटो व मजूर उपलब्ध होत नाहीत. तसेच घरपोच धान्याचे वाटप करताना गर्दी होते. त्यामुळे या भागातील शिधापत्रिकाधारकांना रास्त भाव दुकानांमधून धान्याचे वितरण करण्यात येत आहे.-शत्रुघ्न मुंडे,जिल्हाध्यक्ष, रास्त भाव दुकानदार संघटना.
प्रतिबंधित क्षेत्रात घरपोच धान्य वाटपाचा बोजवारा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 12:00 PM