अकोला : जिल्हा परिषद शिक्षकांच्या आॅनलाइन बदली प्रक्रियेत झालेले मोठे घोळ आता पुढे येत आहेत. १८ मे रोजी बदलीचे आदेश मिळालेल्या शिक्षकांची नावे आता विस्थापित शिक्षकांच्या यादीतही आल्याने त्यांची आधीच्या बदली आदेशाने दिलेली पदस्थापना रद्द करण्याची नामुष्की ओढवली आहे. शेकडो शिक्षकांचे आदेश रद्द झाल्याची माहिती असून, त्यामध्ये शासन स्तरावरूनच बदल करण्यात येत आहे. नेट कनेक्टिव्हिटीची समस्या असल्याने सोमवारी उशिरापर्यंत दहा ते बारा शिक्षकांना तसे आदेश देण्यात आले.आॅनलाइन बदली प्रक्रियेत कनिष्ठांनी वरिष्ठांना खो देणे, विनंती बदली मागूनही पद रिक्त असताना सेवाज्येष्ठतेनुसार शाळा न मिळणे, संवर्ग ४ मध्ये पती-पत्नी ३० किमीपेक्षा जास्त अंतरावर देणे, दोन शिक्षकींवर तीन शिक्षक देणे, मंजूर पदांपेक्षा जादा शिक्षक देणे, ५३ वर्षांवरील शिक्षकांना बदली न मिळणे, पती-पत्नीपैकी एकालाच बदली देणे, अशा अनेक प्रकारे शिक्षकांवर अन्याय झाला आहे. जिल्ह्यात विषय शिक्षकांच्या नियुक्त्या न झाल्यामुळे अनेक जागा रिक्त राहिल्या. त्यामुळे विस्थापित शिक्षकांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. हा गोंधळ आता पुढे आला आहे. काही शाळांवर तर मंजुरीपेक्षा अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांची बदली झाली. दोन शिक्षकी शाळांवर तिघांची बदली करण्यात आली. १८ मे रोजी दिलेल्या बदली आदेशानंतर सोमवारी विस्थापित शिक्षकांची यादी प्रसिद्ध करण्यात आली. त्यामध्ये बदली आदेश दिलेल्या शिक्षकांचाही समावेश आहे. त्यामुळे त्यांचे आदेश रद्द करून दिलेली पदस्थापनाही रद्द करण्याचे आदेश सोमवारीच शासन स्तरावरून देण्यात आले. त्यासाठी शिक्षणाधिकारी कार्यालयातून आॅनलाइन आदेश काढण्याला सुरुवात झाली. नेट कनेक्टिव्हिटीची समस्या असल्याने रात्री उशिरापर्यंत १२ शिक्षकांना आधीची बदली रद्द झाल्याचे आदेश देण्यात आले. विस्थापितांच्या यादीत असल्याने त्यांना नव्याने २० गावांचा पर्याय देण्याचेही बजावले. त्यासाठी बदलीचे पोर्टल सकाळी ११ वाजता सुरू होणार असल्याचेही सांगण्यात आले; मात्र रात्री नऊ वाजेपर्यंतही त्यामध्ये समस्या असल्याचे शिक्षकांनी सांगितले.