अकोला : जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत १० डिसेंबर रोजी वेळेवरच्या विषयात मंजूर करण्यात आलेल्या विविध १८ ठरावांविरुद्ध विरोधकांनी दाखल केलेल्या अपीलवर मंगळवार, ९ फेब्रुवारी रोजी अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयात अंतिम सुनावणी पूर्ण करण्यात आली असून, लवकरच विभागीय आयुक्तांकडून आदेश पारित करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेतील सत्ताधारी व विरोधकांचे विभागीय आयुक्तांच्या आदेशाकडे लक्ष लागले आहे.
जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा गत १० डिसेंबर रोजी ‘व्हिडीओ काॅन्फरन्सिंग’द्वारे घेण्यात आली. या सभेत विषयपत्रिकेवरील बाळापूर व अकोला तालुक्यातील ६९ गावांसाठी नवीन प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या विषयांसह तीन विषय प्रलंबित ठेवण्यात आले. तसेच वेळेवरच्या विषयात विविध १८ ठराव मंजूर करण्यात आले. वेळेवरच्या विषयात मंजूर करण्यात आलेल्या ठरावांविरुद्ध जिल्हा परिषदेतील विरोधी पक्ष असलेल्या शिवसेना सदस्यांनी अमरावती विभागीय आयुक्तांकडे धाव घेत, जिल्हा परिषद अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) यांच्याविरुद्ध अपील दाखल केले होते. या अपीलवर ९ फेब्रुवारी रोजी अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयात अंतिम सुनावणीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. सुनावणी दरम्यान जिल्हा परिषद प्रशासनासह अपीलकर्त्यांच्या वतीने विधिज्ञांनी बाजू मांडली. अंतिम सुनावणीची प्रक्रिया पूर्ण झाली असून, या प्रकरणात विभागीय आयुक्तांकडून लवकरच आदेश पारित करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत वेळेवरच्या विषयात मंजूर करण्यात आलेल्या ठरावांविरुद्ध विभागीय आयुक्तांकडून काय आदेश पारित करण्यात येतात, याकडे आता जिल्हा परिषदेतील सत्ताधारी व विरोधकांचे लक्ष लागले आहे.