अकोला : कोरोनाबाधित रुग्णांसाठी जिल्ह्यातील २६ कोविड रुग्णालयांना ४५४ रेमडेसिविर इंजेक्शन्सचे वाटप करण्यात आले आहे. वाटप करण्यात आलेले रेमडेसिविर इंजेक्शन शासनाने निश्चित केलेल्या दराने वितरण करण्याचा आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष जितेंद्र पापळकर यांनी मंगळवारी दिला.
जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून, कोरोनाबाधित रुग्णांसाठी रेमडेसिविर इजेक्शनच्या मागणीतही वाढ झाली आहे. मागणीच्या तुलनेत रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा होत नसल्याने, रेमडेसिविर इंजेक्शन विक्रीतील काळाबाजाराला आळा घालण्यासाठी कोविड रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांकरिता जिल्हा प्रशासनामार्फत मागणीप्रमाणे कोविड रुग्णालयांना रेमडेसिविर इंजेक्शनचे वाटप सुरू करण्यात आले आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील २६ कोविड रुग्णालयांना ४२५ रेमडेसिविर इंजेक्शनचे वाटप ४ मे रोजी करण्यात आले. संबंधित औषधीच्या दुकानांतून रेमडेसिविर इंजेक्शन प्राप्त झाल्यानंतर रुग्णालयांनी प्राधिकृत व्यक्तीचा फोटो व ओळखपत्र घाऊक विक्रेत्यांकडे सादर करून रेमडेसिविर इंजेक्शनचे वितरण मुदतीत व शासकीय दरात करावे. याबाबत कोणतीही दिरंगाई, टाळाटाळ व कसूर होणार नाही, यासंदर्भात रुग्णालय प्रशासन व घाऊक विक्रेत्यांनी दक्षता घेण्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिला.
अनियमितता आढळल्यास कारवाई करा!
महानगरपालिका, जिल्हा परिषद, औषध प्रशासन व आरोग्य यंत्रणेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी रेमडेसिविर इंजेक्शनचे योग्य वाटप होत असल्याची खातरजमा करून, त्यामध्ये अनियमितता आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचा आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.
आजपासून सुरू होणार तपासणी
कोरोनाबाधित रुग्णांसाठी कोविड रुग्णालयांना वाटप करण्यात येत असलेल्या रेमडेसिविर इंजेक्शनचे मागणीप्रमाणे रुग्णांना वाटप होते की नाही, इंजेक्शनचे वितरण शासनाने निश्चित केलेल्या दरात होते की नाही, यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी गठित केलेल्या चार पथकांमार्फत आज, बुधवारपासून तपासणी सुरू करण्यात येणार आहे.