अकोला : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री कल्याण योजनेंतर्गत जिल्ह्यातील प्राधान्य गट व अंत्योदय अन्न योजनेतील गरीब शिधापित्रकाधारक लाभार्थींना ऑक्टोबर महिन्यातील मोफत धान्य वाटप करण्यासाठी ५२ हजार ३०९ क्विंटल धान्याची उचल जिल्हा पुरवठा विभागाने सुरू केली आहे.
कोरोना विषाणू संसर्गाच्या काळात प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत जुलै ते नोव्हेंबर या कालावधीत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील प्राधान्य गट व अंत्योदय अन्न योजनेंतर्गत शिधापत्रिकाधारक लाभार्थींना प्रतिमहा प्रत्येक लाभार्थीस ३ किलो तांदूळ व २ किलो गहू मोफत वितरित करण्याचा निर्णय राज्य शासनाच्या अन्न नागरी व पुरवठा विभागामार्फत १० जुलै रोजी घेण्यात आला आहे. त्यानुसार दरमहा प्राधान्य गट व अंत्योदय अन्न योजनेतील शिधापत्रिकाधारक लाभार्थींना मोफत धान्य वितरित करण्यात येत आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील प्राधान्य गट व अंत्योदय अन्न योजनेतील शिधापत्रिकाधारक गरीब लाभार्थींना ऑक्टोबर महिन्यातील मोफत धान्य वाटप करण्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयामार्फत २१ हजार ४५८ क्विंटल गहू आणि ३० हजार ८५१ क्विंटल तांदूळ अशी एकूण ५२ हजार ३०९ क्विंटल धान्याची उचल सुरू केली आहे. जिल्ह्यातील शासकीय धान्य गोदामांमध्ये धान्याची उचल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर येत्या २० ऑक्टोबरपासून जिल्ह्यातील रास्तभाव दुकानांमधून शिधापित्रकाधारक लाभार्थींना मोफत धान्याचे वितरण सुरू करण्यात येणार आहे.
प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत जिल्ह्यातील प्राधान्य गट व अंत्योदय अन्न योजनेतील शिधापत्रिकाधारक लाभार्थींना ऑक्टोबर महिन्यातील मोफत धान्याचे वाटप करण्यासाठी ३० हजार ८५१ क्विंटल तांदूळ व २१ हजार ४५८ क्विंटल गहू इत्यादी धान्याची उचल सुरू करण्यात आली आहे.
- बी.यू. काळे, जिल्हा पुरवठा अधिकारी