अकोला: रब्बी हंगामासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप सुरू करण्यात आले आहे. त्यामध्ये ३१ ऑक्टोबरपर्यंत गत महिनाभराच्या कालावधीत जिल्ह्यातील २ हजार २८५ शेतकऱ्यांना १८ कोटी ६६ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे.
यावर्षीच्या रब्बी हंगामात जिल्ह्यात ७ हजार ५०० शेतकऱ्यांना ६० कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनामार्फत ठरविण्यात आले आहे. त्यानुषंगाने गत १ ऑक्टोबरपासून जिल्ह्यातील बॅंकांमार्फत पात्र शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप सुरू करण्यात आले आहे. ३१ ऑक्टोबरपर्यंत गेल्या महिनाभराच्या कालावधीत जिल्ह्यातील २ हजार २८५ शेतकऱ्यांना १८ कोटी ६६ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. त्यामध्ये राष्ट्रीयीकृत बॅंकांमार्फत १ हजार ९४६ शेतकऱ्यांना १५ कोटी २८ लाख रुपये आणि ग्रामीण बॅंकांमार्फत ३३९ शेतकऱ्यांना ३ कोटी ३८ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे.
रब्बी हंगामासाठी जिल्ह्यात शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ३१ ऑक्टोबरपर्यंत २ हजार २८५ शेतकऱ्यांना १८ कोटी ६६ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे.
- आलोक तारेणिया, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बॅंक.