अकोला: जिल्हा परिषद पशुसंवर्धन राबविण्यात येत असलेल्या दुभत्या जनावरे वाटप योजनेंतर्गत निवड करण्यात आलेल्या लाभार्थींना दुभत्या जनावरांचे वाटप करण्याची प्रक्रिया कोरोना रखडली होती. ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची आचारसंहिता संपल्यानंतर लवकरच दुभत्या जनावरांचे वाटप सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे लाभार्थींना योजनेचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
जिल्हा वार्षिक योजना अनुसूचित जाती उपयोजनेंतर्गत २०१९.....२० या आर्थिक वर्षात जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागामार्फत ७५ टक्के अनुदानावर दुभती जनावरे वाटपाची योजना राबविण्यात येत आहे. योजनेंतर्गत निवड करण्यात आलेल्या जिल्ह्यातील लाभार्थींना दोन म्हशी किंवा शेळीगटांचे वाटप करण्यात येते. त्या अनुषंगाने योजनेंतर्गत गतवर्षी जिल्ह्यात निवड करण्यात आलेल्या लाभार्थींना दुभती जनावरे वाटप करण्याची प्रक्रिया जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागामार्फत सुरू करण्यात आली होती. योजनेंतर्गत काही लाभार्थींना दुभत्या जनावरांचे वाटप करण्यात आले होते, परंतु कोरोना विषाणू संसर्गाच्या काळात गत एप्रिलपासून दुभत्या जनावरांचे वाटप करण्याची प्रक्रिया रखडली होती. कोरोनाविषयक नियमांत शिथिलता मिळाल्यानंतर जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागामार्फत ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची आचारसंहिता संपल्यानंतर लवकरच जिल्ह्यातील एक हजार लाभार्थींना दुभत्या जनावरांचे वाटप सुरू करण्यात येणार आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील ५०० लाभार्थींना प्रत्येकी दोन म्हशी व ५०० लाभार्थींना प्रत्येकी दहा शेळ्या व दोन बोकड असे दुभत्या जनावरांचे वाटप करण्यात येणार आहे.
कोरोना काळात दुभती जनावरे वाटप योजनेंतर्गत जिल्ह्यातील लाभार्थींना जनावरे वाटप करण्याची प्रक्रिया थांबविण्यात आली होती. आता ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची आचारसंहिता संपल्यानंतर जिल्ह्यातील लाभार्थींंना दुभत्या जनावरांचे वाटप सुरू करण्यात येणार आहे.
डाॅ.गजानन दळवी
जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद