- संतोष येलकर लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: जिल्ह्यातील शिधापत्रिका आधार क्रमांकाशी संलग्नित (लिंक) करण्याचे काम जिल्हा पुरवठा विभागामार्फत अद्यापही पूर्ण करण्यात आले नसताना, जिल्ह्यात आधार ‘लिंक’ नसलेल्या २३ हजार १८५ गरीब शिधापत्रिकाधारक कुटुंबांना नोव्हेंबरपासून ‘आॅफलाइन’ धान्याचे वितरण बंद करण्यात आले आहे. त्यामुळे शिधापत्रिका आधार ‘लिंक’ करण्याच्या कामातील पुरवठा विभागाच्या दिरंगाईत गरीब लाभार्थी शिधापत्रिकाधारकांना रास्त भावातील धान्याच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे.सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत जिल्ह्यातील लाभार्थी शिधापत्रिकाधारक कुटुंबांना दरमहा रास्त भावाने गहू, तांदूळ इत्यादी धान्याचे वितरण करण्यात येत आहे. शिधापत्रिका आधार क्रमांकाशी ‘लिंक’ करण्यात आलेल्या लाभार्थी शिधापत्रिकाधारक कुटुंबांना जिल्ह्यातील १ हजार रास्त भाव दुकानांमधून ‘ई-पॉस’ मशीनद्वारे धान्याचे वितरण करण्यात येत आहे; परंतु जिल्ह्यातील सर्व शिधापत्रिका आधार क्रमांकाशी ‘लिंक’ करण्याचे २०१७ पासून सुरू असलेले काम जिल्हा पुरवठा विभागामार्फत अद्याप पूर्ण करण्यात आले नाही. शिधापत्रिका आधार क्रमांकाशी ‘लिंक’ करण्याचे काम पूर्ण झाले नसताना, आधार ‘लिंक’ नसलेल्या जिल्ह्यातील २३ हजार १८५ शिधापत्रिकाधारक लाभार्थी कुटुंबांना ‘आॅफलाइन’ धान्याचे वितरण गत नोव्हेंबरपासून जिल्हा पुरवठा विभागामार्फत बंद करण्यात आले. शिधापत्रिका आधार ‘लिंक’ करण्याच्या कामात पुरवठा विभागाच्या दिरंगाईत आधार क्रमांक ‘लिंक’ नसलेल्या जिल्ह्यातील गरीब शिधापत्रिकाधारक कुटुंबांना रास्त भावातील धान्याच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे.त्यानुषंगाने जिल्ह्यातील शिधापत्रिका आधार क्रमांकाशी ‘लिंक’ करण्याचे काम जिल्हा पुरवठा विभागामार्फत केव्हा पूर्ण होणार आणि आधार ‘लिंक’ नसलेल्या शिधापत्रिकाधारक कुटुंबांना रास्त भावाच्या धान्याचा लाभ केव्हा मिळणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.पुरवठा विभागाकडे माहितीच नाही!आधार ‘लिंक’ नसलेल्या जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांना गत नोव्हेंबरपासून आॅफलाइन धान्याचे वितरण बंद करण्यात आले. यासंदर्भात १० डिसेंबर रोजी जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय आणि जिल्हा पुरवठा अधिकारी बी. यू. काळे यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याकडून कोणतीही माहिती मिळू शकली नाही.आधार क्रमांक ‘लिंक’ नसल्याच्या नावावर शिधापत्रिकाधारक कुटुंबांना आॅफलाइन धान्याचे वितरण बंद करण्यात आहे. हे अयोग्य असून, जिल्ह्यातील शिधापत्रिका आधार क्रमांकाशी ‘लिंक’ करण्याचे काम जिल्हा पुरवठा विभागाने पूर्ण करून धान्याच्या लाभापासून वंचित असलेल्या शिधापत्रिकाधारक कुटुंबांना तातडीने धान्याचे वितरण सुरू केले पाहिजे.- योगेश अग्रवाल,शहर अध्यक्ष,रास्त भाव दुकानदार संघटना, अकोला.शिधापत्रिका आधार क्रमांकाशी ‘लिंक’ नसलेल्या जिल्ह्यातील २३ हजार १८५ शिधापत्रिकाधारक कुटुंबांना आॅफलाइन धान्याचे वितरण गत नोव्हेंबरपासून बंद करण्यात आले आहे. आधार ‘लिंक’ करण्याचे काम जिल्हा पुरवठा विभागामार्फत पूर्ण करण्यात आले नाही. त्यामुळे आधार ‘लिंक’ नसलेल्या शिधापत्रिकाधारक लाभार्थी कुटुंबांना पुरवठा विभागाने आधार ‘लिंक’ होईपर्यंत आॅफलाइन धान्य वितरित केले पाहिजे.-शत्रुघ्न मुंडे, जिल्हाध्यक्ष, रास्त भाव दुकानदार संघटना.