अकोला : कोरोनाकाळात गेल्या वर्षभरापासून अंगणवाड्या बंद असल्या तरी, जिल्ह्यात अंगणवाड्यांमधील ९२ हजार बालकांना पूरक पोषण आहाराचे वाटप करण्यात येत आहे.
जिल्ह्यातील एक हजार ३९० अंगणवाड्यांतील बालकांचा समावेश आहे. जिल्ह्यात एक हजार ३९० अंगणवाड्या असून, कोरोना विषाणू संसर्गाच्या परिस्थितीत गतवर्षी मार्चपासून अंगणवाड्या बंद आहेत. त्यामुळे अंगणवाड्यांमध्ये बालकांना पूर्वशालेय शिक्षणाचे धडे देण्याचे काम बंद असले तरी, अंगणवाड्यांमधील सहा महिने ते तीन वर्षे वयोगटातील बालकांना दोन महिन्यांतून एकदा ५० दिवसांचा पूरक पोषण आहार घरोघरी वाटप करण्याचे काम अंगणवाडीसेविका व मदतनिसांमार्फत सुरू आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यातील एक हजार ३९० अंगणवाड्यांतील ९२ हजार बालकांना पूरक पोषण आहाराचे वाटप करण्यात येत असल्याचे जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विलास मरसाळे यांनी सांगितले.