लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामध्ये गरिबांची उपासमार होऊ नये आणि गरिब शिधापत्रिकाधारक धान्यापासून वंचित राहू नये, यासाठी जिल्ह्यातील ११ लाख ७५ हजार २६३ गरीब शिधापत्रिकाधारकांना एप्रिल, मे व जून या तीन महिन्यांच्या धान्याचे वितरण शनिवारपासून सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा पुरवठा विभागामार्फत १ लाख ८ हजार ८१० क्विंटल धान्याचा साठा जिल्ह्यातील तालुका स्तरावर वितरीत करण्यात आला आहे.कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी २४ मार्चपासून राज्यभरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. संचारबंदीच्या कालावधीत गरीब कुटुंबांची उपासमार होऊ नये, तसेच धान्याच्या लाभापासून वंचित राहू नये, यासाठी गरीब शिधापत्रिकाधारकांना एप्रिल, मे व जून या तीन महिन्यांचे धान्य वितरण चालू महिन्यात (मार्चमध्ये) करण्याचा आदेश शासनामार्फत देण्यात आला आहे.त्यानुसार जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत प्राधान्य गट आणि अंत्योदय अन्न योजनेंतर्गत एकूण ११ लाख ७५ हजार २६३ शिधापत्रिकाधारक लाभार्थींना एप्रिल, मे व जून या तीन महिन्यांचे धान्य २८ मार्चपासून जिल्ह्यातील रास्त भाव दुकानांमधून सुरू करण्यात येणार आहे.गरीब शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांना तीन महिन्यांचे धान्य वितरीत करण्यासाठी १ लाख ८ हजार ८१० धान्याचा साठा जिल्हा पुरवठा विभागामार्फत जिल्ह्यातील तालुका स्तरावर वितरीत करण्यात आला आहे. त्यामध्ये ६१ हजार १५५ क्विंटल गहू आणि ४७ हजार ६५५ क्विंटल तांदूळ इत्यादी धान्याचा समावेश आहे.