कामांचे नियोजन करा: जिल्हाधिकार्यांचे जिल्हा परिषद, जलसंधारण विभागाला निर्देश
अकोला: गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेंतर्गत जिल्हय़ात ५0 गावतलाव आणि २0 पाझर तलावातील गाळ काढण्यात येणार आहे, त्यासाठी पावसाळ्यापूर्वी कामांचे नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडेय यांनी शनिवारी जिल्हा परिषद व जलसंधारण (लघुसिंचन) विभागाला दिले. शासनामार्फत राज्यात गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना राबविण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. या योजनेंतर्गत जिल्हय़ात जिल्हा परिषदमार्फत ५0 गावतलाव व १0 पाझर तलाव आणि जलसंधारण (लघुसिंचन) विभागामार्फत १0 पाझर तलावातील गाळ काढण्याच्या कामांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार पावसाळा सुरू होण्यापूर्वी गाळ काढण्याच्या कामांचे नियोजन करून, कामे पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडेय यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जलसंधारण (लघुसिंचन) विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना ६ मे रोजी पत्राद्वारे दिले. त्यानुसार संबंधित यंत्रणांमार्फत जिल्हय़ातील गावतलाव व पाझर तलावातील गाळ काढण्याच्या कामांचे नियोजन लवकरच करण्यात येणार आहे.