अकोला: जल जीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागात नळ पाणी पुरवठा योजनांच्या कृती आराखड्यास जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन समितीच्या बैठकीत सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली. मंजुरी देण्यात आलेल्या कृती आराखड्यात २२७ पाणी पुरवठ्याच्या योजना प्रस्तावित करण्यात आल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन समितीची बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी साैरभ कटियार, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता नीलेश राठोड, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता एस.एम. गायकवाड, वरिष्ठ भूवैज्ञानिक आर. टी. शेलार, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उपविभागीय अभियंता राजेंद्र चाैधरी, मिलिंद जाधव, कांचन उमाळे, वन विभागाचे आर.ए. ओवे आदी उपस्थित होते. जल जीवन मिशन अंतर्गत ग्रामीण भागात प्रत्येक कुटुंबास नळजोडणीव्दारे २०२४ पर्यंत दरडोइ प्रतिदिवस ५५ लीटर पाणी उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. त्यासाठी करावयाच्या उपाययोजनांसाठी केंद्र व राज्य शासनाकडून प्रत्येकी ५० टक्के व लोकवर्गणीतून १० टक्के निधी उपलब्ध करावयाचा आहे. त्यानुषंगाने जल जीवन मिशन अंतर्गत जिल्हा कृती आराखड्यात जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभाग व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून प्रस्तावित करण्यात आलेल्या २२७ पाणी पुरवठा योजनांचा समावेश आहे. प्रस्तावित योजनांच्या कृती आराखड्यास जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी मंजुरी दिली.
कृती आराखड्यास प्रस्तावित अशा आहेत योजना!
जल जीवन मिशन अंतर्गत जिल्हा कृती आराखड्यात २२७ पाणी पुरवठा योजना प्रस्तावित करण्यात आल्या. त्यामध्ये पूर्ण झालेल्या पाणी पुरवठा योजनांची रिट्रोफिटींग करणे १५१ योजना, कामे सुरू
असलेल्या पाणी पुरवठा योजनांची रिट्रोफिटींग करणे २० योजना, प्रगतीपथावर असलेल्या ७ योजना व नवीन ४९ योजना इत्यादी पाणी पुरवठा योजनांच्या कामांचा समावेश आहे.