अकोला : मृग नक्षत्र सुरू झाल्याने शेतकऱ्यांची पेरणीसाठी लगबग सुरू झाली आहे. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि पेरणी यशस्वी करण्यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा आत्मा प्रकल्प संचालक डॉ. कांतप्पा खोत यांनी पुढाकार घेतला असून, जिल्ह्यात ठिकठिकाणी आकस्मिक भेटी दिल्या. यावेळी घुसर गावातील दीपक चोपडे यांच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष तिफण वाहून पेरणीचा शुभारंभ केला.
राज्यात ८ जूनपासून मान्सून सर्वत्र पसरला असून, कमी-अधिक प्रमाणात सर्वत्र पाऊस सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची पेरणीची लगबग वाढली असून, काही ठिकाणी पेरणीस प्रारंभ झाला आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. खोत हे दररोज जिल्हाभरातील विविध गावांमध्ये अचानक जाऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेत आहेत. सोबतच प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करीत आहे. त्यांच्यासोबत कृषी अधिकारी मनीष मनभेकर, आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक व्ही. एम. शेगोकार यांच्यासह कृषी विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.