अकोला : राज्यातील सर्व जिल्हा व सत्र न्यायालयाच्या वेळांमध्ये सोमवारपासून बदल होणार आहे. न्यायालयाचे कामकाज एका सत्रात सुरू असून, ते कामकाज आता दोन सत्रात होणार असल्याची माहिती आहे. तर स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या सोयीनुसार हा निर्णय घेण्यात येणार आहे. असे उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशात नमूद केले आहे.कोरोनाच्या संकटामुळे अनेक दिवसांपासून मर्यादीत न्यायाधीश व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत न्यायालयांचे कामकाज सुरू आहे; मात्र सोमवारपासून जिल्हा व सत्र न्यायालयातील मनुष्यबळाची टक्केवारी वाढविण्यात येणार आहे. दोन सत्रात १०० टक्के न्यायाधीशांची उपस्थिती तर न्यायालयीन कर्मचाऱ्यांची उपस्थिती ५० टक्के रोटेशन पद्धतीने दोन सत्रात राहणार आहे. न्यायाधीशांचे पहिल्या सत्राचे कामकाज सकाळी १०.३० ते १.३० व दुसºया सत्राचे कामकाज २.३० ते ५.३० असे असेल. तसेच न्यायालयीन कर्मचाºयांचे पहिल्या सत्राचे कामकाज सकाळी १० ते दुपारी १.४५ व दुसºया सत्राचे कामकाज दुपारी २ ते ५.४५ राहणार आहे; मात्र त्यात केवळ महत्त्वाच्या आणि तत्काळ प्रकरणांवर सुनावणी होणार आहे. पूर्वीप्रमाणे सर्व खटल्यांचे नियमित कामकाज चालणार नाही. सर्व न्यायाधीशांनी न्यायालयात उपस्थित राहून महत्त्वाच्या प्रकरणाची सुनावणी घ्यावी, जेथे एकच कोर्ट आहे तेथे केवळ सकाळचे एकच सत्र घ्यावे, असे परिपत्रक उच्च न्यायालयाने जारी केले आहे. त्यामुळे गेल्या साडेपाच महिन्यांपासून रेंगाळलेल्या कामकाजाला काहीशा प्रमाणात गती येणार आहे. असे असले तरी न्यायालयात गर्दी होणार नाही फिजिकल डिस्टन्सच्या नियमाचे पालन करूनच कामकाज होणार आहे.