अकोला: जिल्ह्यात गौण खनिजाच्या चोरीला आळा घालण्यासाठी जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय पथके गठित करण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी ११ जानेवारी रोजी दिला. कार्यक्षेत्रातील गौण खनिजाचे अवैध उत्खनन व वाहतुकीसंदर्भात केलेल्या कारवाईचा अहवाल सादर करण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा व तालुकास्तरीय पथकांना दिले.
जिल्ह्यातील वाळू, मुरूम, माती इत्यादी गौण खनिजाचे अवैध उत्खनन व वाहतूकसंदर्भात अनेक तक्रारी शासनाकडे प्राप्त होत आहेत. तसेच जिल्ह्यातील लिलाव न झालेल्या घाटांमधून वाळूची अवैध वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असल्याच्या तक्रारीही होत आहेत. त्यानुषंगाने जिल्ह्यातील गौण खनिजाच्या चोरीला आळा घालण्यासाठी जिल्ह्यात कोणत्याही ठिकाणी आकस्मिक धाडी घालून तपासणी करून, कारवाई करण्यासाठी जिल्हास्तरीय पथक आणि तालुकास्तरावर तालुकास्तरीय पथके गठित करण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी ११ फेब्रुवारी रोजी दिला. गठित केलेल्या पथकांनी संबंधित कार्यक्षेत्रात गौण खनिजाचे अवैध उत्खनन व अवैध वाहतूक संदर्भात दंडात्मक कारवाई करून केलेल्या कारवाईचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात दिले आहेत.
जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय
पथकांमध्ये ‘यांचा’ आहे समावेश!
जिल्ह्यातील गौण खनिजाच्या चोरीला आळा घालण्यासाठी जिल्हास्तरीय पथक व सातही तालुकास्तरावर तालुकास्तरीय पथके गठित करण्यात आली. त्यामध्ये अकोला उपविभागीय अधिकारी कार्यालयाचे नायब तहसीलदार अजय तेलगोटे यांच्या नेतृत्वातील जिल्हास्तरीय पथकात एक पोलीस उपनिरीक्षक, एक महसूल मंडळ अधिकारी, एक तलाठी व दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर तालुकास्तरीय पथकांमध्ये एक नायब तहसीलदार, एक पोलीस उपनिरीक्षक, एक महसूल मंडळ अधिकारी, एक तलाठी व दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.