बुलडाणा : आर्थिक परवाना मिळविण्यासाठी बुलडाणा जिल्हा बँकेने सर्व बँकिंग प्रक्रिया पूर्ण कराव्यात, अशा आशयाचे पत्र रिझर्व्ह बँकेने जिल्हा बँकेला १८ सप्टेंबरला पाठविले आहे. त्यावर तातडीने कारवाई करीत, जिल्हा बँकेने बँकिंग व्यवहाराची इत्थंभूत माहिती रिझर्व्ह बँकेने दिलेल्या फॉर्मेटमध्ये नाबार्डच्या माध्यमातून पाठविली आहे. या सर्व घडामोडींमुळे दिवाळीपूर्वीच जिल्हा बँकेला आर्थिक परवाना मिळण्याचे शुभसंकेत असून, ही बँक सुरू झाल्यानंतर सहकार चळवळीला नवी उभारी येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. नागपूर आणि वर्धा जिल्हा बँकही ऑक्टोबरपूर्वीच सुरू होण्याची शक्यता यापृष्ठभूमिवर व्यक्त केली जात आहे. रिझर्व्ह बँकेने जिल्हा बँकेचा परवाना रद्द केल्यानंतर तो परत मिळविण्यासोबतच बॅकेचे पुनरूज्जीवन करण्यासाठीही शासनाने पुढाकार घेतला आहे. नाबार्डसोबत राज्य शासनाने केलेल्या सांमजस्य कराराला केंद्र सरकारने मान्यता दिल्यामुळे अडचणीत आलेल्या बँकाना मदतीचा हात मिळाला. बुलडाणा जिल्हा बँकेला राज्य सरकारने १९ जून २0१४ रोजी घेतलेल्या निर्णयानुसार १२४.0४ कोटी रुपये भागभांडवलाच्या रूपात आर्थिक साहाय्य मिळणार होते. त्यामध्ये वाढ होऊन जिल्हा बँकेला १३७ कोटीची मदत मिळाली आहे. त्यामुळे बँकेचे ७ ट क्के सीआरएआरचे लक्ष्य पूर्ण होणार आहे. आर्थिक कारणांमुळे डबघाईस आलेल्या नागपूर, वर्धा आणि बुलडाणा येथील जिल्हा बँका ऑक्टोबरमध्ये सुरू होणार आहेत. शेतकर्यांना खरीप हंगामासाठी कर्ज मिळाले नसले तरी रबीकरि ता कर्ज देण्याची या बँकांची तयारी राहणार आहे. तिन्ही बँकांचे नाबार्डतर्फे ऑडिट करण्यात आले असून, तो अहवाल रिझर्व्ह बँकेला पाठविण्यात आला आहे. आर्थिक परवान्यासाठी रिझर्व्ह बँकेची कारवाई सुरू आहे. कोणत्या बँकेला किती निधी लागेल, हे पाहून राज्य सरकारला त्याची पूर्तता करावी लागणार आहे. एकूण ११४.८२ कोटी रुपये तिन्ही जिल्हा बँकांना अतिरिक्त द्यावे लागतील. यापूर्वी राज्य सरकारने या बँकांना ३८0 कोटी रुपये दिले आहेत. जिल्हा बँका सुरू झाल्यानंतर नाबार्ड दर महिन्याला बँकांचा आढावा घेणार आहे. सध्या त्या-त्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी प्रशासक आहेत. यापुढे बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञांची सीईओ या पदावर नियुक्ती केली जाईल, तसेच बँकांमधील कर्मचार्यांचे मनोबल वाढविण्यासाठी त्यांना प्रशिक्षणही देण्यात येणार आहे.
दिवाळीपूर्वीच सुरू होणार जिल्हा सहकारी बँका
By admin | Published: September 22, 2015 1:03 AM