अकोला: जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाला मंगळवारी भेट देऊन, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी शिक्षण विभागाच्या कारभाराची झाडाझडती घेतली. शिक्षकांची बिंदुनामावली (रोस्टर) तातडीने तयार करून मान्यता घेण्याचे निर्देशही जिल्हाधिकार्यांनी शिक्षण विभागाला दिले. जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत शिक्षकांची बिंदुनामावली अद्याप तयार करण्यात आली नसून, मान्यता घेणे प्रलंबित आहे. बिंदुनामावली मंजूर नसल्याने, शिक्षकांच्या बदल्या, पदोन्नत्ती व अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया रखडली आहे. या पृष्ठभूमीवर जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाला मंगळवारी सकाळी भेट देऊन, शिक्षण विभागाच्या कारभाराची झाडाझडती घेतली. शिक्षकांची बिंदुनामवली मान्यतेअभावी अद्याप प्रलंबित असल्याच्या मुद्दय़ावर विभागाच्या कारभारावर जिल्हाधिकार्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच शिक्षकांची बिंदुनामावली तयार करण्याचे काम तातडीने पूर्ण करून, मान्यता घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी शिक्षण विभागाला दिले. शिक्षण विभागामार्फत नवीन योजना राबविण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. यावेळी जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) एस.एम. कुळकर्णी, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) प्रशांत दिग्रसकर यांच्यासह संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हाधिका-यांनी घेतली शिक्षण विभागाची झाडाझडती!
By admin | Published: July 06, 2016 2:19 AM