अकोला: लोकसहभागातून स्वच्छ करण्यात आलेल्या मोर्णा नदी काठावर सध्या जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या मार्गदर्शनाखाली मोठया प्रमाणात विकास कामे सुरु आहेत. आज सकाळी स्वत: जिल्हाधिकारी यांनी मोर्णा नदीला भेट देऊन विकास कामांची पाहणी केली. यावेळी त्यांनी कामांबददल विविध सूचना करुन पावसाळयापूर्वी कामे पूर्ण करण्याची सूचना केली.
स्वच्छतेमुळे मोर्णा नदीचा कायापालट झाला आहे. काही महिन्यांपूर्वी अस्वच्छ असणारी मोर्णा आता सर्वांसाठी आकर्षणाचे केंद्र बनली आहे. नदी पात्रातील जलकुंभी व कचरा हटवण्यात आला असून ज्या ठिकाणी जलकुंभी आहे, तेथे आजही जीसीबीव्दारे जलकुंभी हटवण्याचे काम वेगाने सुरु आहे. जिल्हाधिकारी यांनी आज सकाळी लक्झरी बसस्टँड मागील बाजूला असणाऱ्या निमवाडी आणि गीतानगर येथील नदी काठाला भेट दिली. सध्या निमवाडी येथे घाटाचे काम वेगाने सुरु आहे. तसेच लाईटचे खांब उभारण्याचे काम सुरु आहे. या सर्व कामांची जिल्हाधिकाऱ्यांनी बारकाईने पाहणी करुन संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या. त्यानंतर गीतानगर येथील नदीकाठाला भेट दिली. येथे वॉकिंग ट्रॅक तयार केला जाणार आहे. वॉकिंग ट्रॅक अत्यंत सुंदर व लोकांना आकर्षित करणारा असावा, अशी सूचना त्यांनी यावेळी केली. पुढे गीतानगर-अकोली येथील नदीकाठची त्यांनी पाहणी केली. या नदीकाठावर जेसीबीव्दारे जलकुंभी व कचरा काढण्याचे काम सुरु आहे. मे अखेरपर्यंत जलकुंभी व कचरा काढण्याबरोबरच विकासाची कामे पूर्ण करण्याची सूचना त्यांनी केली. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, तहसिलदार राजेश्वर हांडे, बीसीसी कंपनीचे प्रकल्प व्यवस्थापक सी. श्रीवास्तव, मनपाचे कार्यकारी अभियंता अजय गुजर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहायक अभियंता संजय शेळके, नाझर श्री. साठे आदी उपस्थित होते.