- अनिल गिऱ्हे
व्याळा (जि. अकोला) : काम करण्याच्या आपल्या अनोख्या शैलीसाठी प्रसिद्ध असलेले अकोल्याचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी मंगळवारी येथील जिल्हा परिषद शाळेला भेट दिली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांसोबत शालेय पोषण आहाराच्या खिचडीचा आस्वाद घेऊन त्यांच्याशी संवाद साधला.जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय हे मंगळवारी दुपारी मतदान केंद्र अधिकारी (बीएलओ)चा आढावा घेण्यासाठी व्याळा येथील जिल्हा परिषद शाळेत आले होते. त्यांच्यासोबत उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, उप जिल्हाधिकारी वैशाली देवकर आदी अधिकारी मंडळीही होती. शाळेत प्रवेश केल्यावर जिल्हाधिकाऱ्यांना शाळेतील मुले शालेय पोषण आहार घेत असताना दिसले. जिल्हाधिकाऱ्यांनी थेट आपला मोर्चा विद्यार्थ्यांकडे वळवला आणि त्यांच्यासोबत संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांसोबत रांगेत बसून खिचडीचा आस्वादही घेतला. विद्यार्थ्यांसोबत मनमोकळ्या गप्पा मारताना जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना विविध प्रश्न विचारले. जिल्हाधिकाºयांनी विद्यार्थ्यांचे मनोबल वाढावे म्हणून साधलेल्या संवादाचे पालकांसह ग्रामस्थांनी आभार मानले.