लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जुने शहरातील विजय गोडाले हत्याकांडातील आरोपींना खुनाऐवजी निष्काळजीपणे वाहन चालवून मरणास कारणीभूत ठरल्यावरून सात वर्षांची शिक्षा जिल्हा न्यायालयाने सुनावली होती. या आदेशाला सरकार पक्षातर्फे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात येत असून, त्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.डाबकी रोड पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या शुभम गोडाले तथा बल्लू रामसिंग गोडाले यांच्यामध्ये वाद झाला होता. हा वाद विकोपाला गेल्याने विजय गोडाले यांनी यामध्ये मध्यस्ती करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर २५ नोव्हेंबर २०१३ रोजी विजय मोहन गोडाले तथा कृष्ण संतोष गोडाले हे दोघेही दुचाकीवरून जात असताना त्यांच्यावर श्रीवास्तव चौकामध्ये प्राणघातक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये विशाल रामसिंग डिकाव, कुणाल रामसिंग डिकाव या दोघांनी त्यांच्यावर लोखंडी पाइप व बेसबॉलच्या बॅटने हल्ला चढविला. यामध्ये विजय गोडाले गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी यामध्ये खुनाचा गुन्हा दाखल करून प्रकरण न्यायप्रविष्ट केले. तृतीय जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. जाधव यांच्या न्यायालयात सुनवाई झाली. न्यायालयाने दोषींवर निष्काळजीपणे वाहन चालवून मरणास कारणीभूत ठरल्यावरून सात वर्षांची शिक्षा सुनावली. त्यासोबतच प्रत्येकी तीन हजार रुपये दंडही ठोठावला. दरम्यान, ही घटना निष्काळजीपणे वाहन चालवून झाली नसल्याचे सरकार पक्षाचे म्हणणे आहे. विजय गोडाले यांची हत्या करण्यात आली असून, त्यांच्या डोक्यावर व शरीरावर एक नव्हे, भरपूर घाव आहेत. त्यामुळे त्यांची हत्या ही सुनियोजित खून असून, त्याला ठार मारल्या गेल्याचेही सरकार पक्षाचे म्हणणे आहे. त्यानुसार सरकारपक्षातर्फे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये या निर्णयाविरोधात आव्हान देण्याची तयारी करण्यात आली असून, त्यासंदर्भातील कागदपत्रे संबंधितांकडे पाठविण्यात आली आहेत. लवकरच त्यावर निर्णय होऊन आव्हान याचिका दाखल होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
जिल्हा न्यायालयाच्या आदेशाला दिले उच्च न्यायालयात आव्हान!
By admin | Published: June 08, 2017 1:33 AM