तेल्हारा: सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेला तालुका विकास व मूलभूत सुविधांबाबत मागे असेल, तरी आज जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी व जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या मुख्य म्हणजे सिव्हिल सर्जन या दोन्ही पदावर असणाऱ्या व्यक्ती तेल्हारा तालुक्यातील असल्याने तालुकावासीयांसाठी ही बाब प्रेरणादायी आहे. तालुक्यातील उकळीबाजार येथील तेजराव रामकृष्ण काळे यांची शिक्षणाधिकारी(माध्यमिक) पदी, तर पाथर्डी येथील डॉ. वंदना रामदास वसो या सिव्हिल सर्जन या पदावर कार्यरत आहेत.
तालुक्यात आजपर्यंत अनेकांनी विविध क्षेत्रात नेतृत्व केले व सद्यस्थितीत करीत आहेत. ज्या जिल्ह्यात लहानाचे मोठे झालो, त्याच जिल्ह्याच्या एका खात्याची सूत्रे सांभाळणारी पदे व त्यातही आरोग्य व शिक्षण क्षेत्रासारखी महत्त्वाची पदे एकाच तालुक्यातील दोन व्यक्तीकडे येत असतील तर याला तालुक्यासाठी दुग्धशर्करा योग म्हणावा लागेल.
तालुक्यातील उकळीबाजार येथील तेजराव रामकृष्ण काळे यांची शिक्षणाधिकारी(माध्यमिक) म्हणून नुकतीच नियुक्ती झाली. काळे यांचा उकळीबाजार येथे जन्म झाला असून, त्यांनी सुरुवातीला तेल्हारा येथे शिक्षण पूर्ण करीत एमएससी पूर्ण करीत अमरावती विद्यापीठातून गोल्ड मेडिलिस्ट ठरले. त्यानंतर खासगी शाळेत शिक्षक पदावर, त्यानंतर शासकीय परीक्षा देत शासकीय निकेतन अमरावती येथे प्राचार्य, त्यानंतर अमरावती येथे शिक्षण सह संचालक व शिक्षणाधिकारी प्रभार सांभाळला. यासारखी मुख्य पदे त्यांनी सांभाळली आहेत. नुकतीच त्यांची जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी या पदावर बदली झाली आहे. तसेच सिव्हिल सर्जन(जिल्हा शल्यचिकित्सक) या पदी तालुक्यातील पाथर्डी येथील डॉ. वंदना रामदास वसो (लग्नानंतरचे नाव वंदना भरत पटोकार) यांची काही दिवसांपूर्वीच पदोन्नती होऊन नियुक्ती झाली. त्यांचा जन्म सुद्धा पाथर्डी येथे होऊन त्यांनी अकोट येथे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर शासकीय कॉलेज नागपूर येथून एमबीबीएस पूर्ण करीत औरंगाबाद येथे सेवा दिली. त्या जिल्ह्यातील पहिले आयएएस स्व.रवींद्र वसो यांच्या बहिणी आहेत.