अकोला : जिल्ह्यातील स्थगित करण्यात आलेल्या पोटनिवडणुकांच्या जिल्हा परिषदेचे १४ गट आणि पंचायत समित्यांच्या २८ गणांत सद्य:स्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव नसून, कोरोनाबाधित ॲक्टिव्ह रुग्ण आणि मृत्यूची संख्याही निरंक असल्याचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शुक्रवारी (दि.३) राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात आला.
राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांच्या कार्यक्रमानुसार जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या १४ आणि जिल्ह्यातील सात पंचायत समित्यांच्या २८ रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. त्यामध्ये दाखल करण्यात आलेल्या उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया गत ६ जुलैला पूर्ण करण्यात आली होती. त्यानंतर मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांच्या प्रक्रियेला राज्य निवडणूक आयोगाच्या ९ जुलैच्या आदेशानुसार स्थगिती देण्यात आली होती. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर पोटनिवडणुकांवरील स्थगिती उठविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्या नुषंगाने स्थगित करण्यात आलेल्या पोटनिवडणुकांच्या क्षेत्रातील कोरोना प्रादुर्भावाची सद्य:स्थिती, कोरोनाबाधित ॲक्टिव्ह रुग्ण संख्या, तसेच मृत्यू संख्या याबाबतचा अहवाल तातडीने सादर करण्याचा आदेश राज्य निवडणूक आयोगामार्फत २ सप्टेंबरला जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला. त्यानुषंगाने जिल्ह्यातील स्थगित करण्यात आलेल्या पोटनिवडणुकांच्या जिल्हा परिषदेचे १४ गट आणि पंचायत समित्यांच्या २८ गणांच्या क्षेत्रात सद्य:स्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव नसून, ॲक्टिव्ह रुग्ण आणि मृत्यूची संख्या निरंक असल्याचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत ३ सप्टेंबर रोजी राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात आला.
कोरोनाचा प्रादुर्भाव नसलेले असे आहेत
जिल्हा परिषदेचे गट; पंचायत समित्यांचे गण!
जिल्हा परिषदेच्या दानापूर, अडगाव बु., तळेगाव बु., अकोलखेड, कुटासा, लाखपुरी, बपोरी, घुसर, कुरणखेड, कानशिवणी, अंदुरा, देगांव, दगडपारवा व शिर्ला, आदी १४ गटांत, तसेच त्याअंतर्गत पंचायत समित्यांच्या हिवरखेड, अडगाव बु., वाडी अदमपूर, भांबेरी, पिंप्री खुर्द, अकोलखेड, मुंडगांव, रौंदळा, लाखपुरी, ब्रह्मी खुर्द, माना, कानडी, दहिहांडा, घुसर, पळसो, कुरणखेड, चिखलगाव, निमकर्दा, पारस भाग १, देगाव, वाडेगाव भाग २, दगडपारवा, मोऱ्हळ, महान, पुनोती बु., शिर्ला, खानापूर व आलेगाव, आदी २८ गणांमध्ये सद्य:स्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव नाही. असे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात आलेल्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील पोटनिवडणुकांची प्रक्रिया स्थगित असलेल्या जिल्हा परिषदेचे १४ गट आणि पंचायत समित्यांच्या २८ गणांच्या क्षेत्रात सद्य:स्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव नसल्याचा अहवाल राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात आला आहे.
संजय खडसे
निवासी उपजिल्हाधिकारी.