संजय उमक
मूर्तिजापूर: जिल्ह्यासह तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दीवर नियंत्रण आणणे आवश्यक असल्याने, जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश जारी करून नवीन निर्बंध घातले आहेत. त्यानुसारच आंतर जिल्हा प्रवासाठी अटी-शर्थी लादल्या आहेत. जिल्ह्यात पर जिल्ह्यातून प्रवेश करणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यासाठी तालुक्यात केवळ दोन चेकपोस्ट स्थापन करून सीमा बंद करण्यात आल्या आहे, वाहने इतर मार्गाने तालुक्यात व जिल्ह्यात प्रवेश करीत असल्याने, चेकपोस्टवर केवळ नावापुरतेच असल्याचे दिसून येत आहे.
तालुक्यासाठी दोन चेकपोस्ट असून, अनेक गाड्या न तपासता किंवा कुठलीही पास अथवा परवाना नसताना सोडून दिल्या जात असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. दरम्यान, तालुक्यातील महत्त्वाच्या सीमा बंद न केल्याने इतर जिल्ह्यातील वाहने या मार्गाने तालुक्यात दाखल होत आहे. जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यासाठी तालुका स्तरावर आठ चेकपोस्टची आवश्यकता असून, तालुक्यातील या सर्वच चेकपोस्टवर कडक बंदोबस्त असणे गरजेचे आहे, परंतु चेकपोस्टला भेटी दिल्या असता, या कामात हलगर्जी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. तालुक्यात सद्यस्थितीत कुरुम आणि बिडगाव असे दोनच चेकपोस्ट आहेत. चेकपोस्टवर राहूटी लावण्यात आली आहे. विशेष म्हणजे आसरा, दर्यापूर लाखपुरी-शेलूनजीक आणि दर्यापूर - रामतीर्थ (म्हैसांग मार्गे) मूर्तिजापूर मार्ग अमरावती तर पिंजर मार्ग (कारंजा) वाशिम जिल्ह्याला जोडल्या गेले आहे. या महत्त्वाच्या मार्गावर कुठेही चेकपोस्ट नसल्याने, उपरोक्त जिल्ह्यातून मूर्तिजापूरात सहजरीत्या लोक दाखल होत आहेत, तर अनेक चेकपोस्टवर कर्मचारी हलगर्जीपणा करीत असल्याची बाब स्पष्ट झाली आहे. यामुळे या तालुक्यावर आलेले कोरोना संकट अधिकच गडद होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
----------------------------------------
नुकतीच जिल्हाबंदी झाली असून, आम्ही कुरुम व बिडगाव येथे दोन चेकपोस्ट स्थापन केले आहेत. लवकरच इतर ठिकाणी चेकपोस्ट लावण्याची प्रक्रिया सुरू आहे, ती एक-दोन दिवसांत पूर्ण होईल.
-प्रदीप पवार, तहसीलदार, मूर्तिजापूर.
------------------------------
चेकपोस्टवर सुविधांचा अभाव!
चेकपोस्टवर केवळ राहूटी उभारली असून, ड्युटी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ऊन, वारा, पाऊस, यापासून बचाव करण्यासाठी दुसरा कुठलाही पर्याय उपलब्ध नाही. संपूर्ण चेकपोस्टवर सॅनिटायझर, पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधा रात्री थांबण्याची व्यवस्था, रात्री प्रकाशाची व्यवस्था नसल्याने अनेक सुविधांचा अभाव दिसून आला.