अकोला: जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत बदल्यांची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जिल्हास्तरीय समिती गठित करण्यात येत असल्याचा आदेश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी ( सीइओ) सौरभ कटियार यांनी १५ एप्रिल रोजी दिला. त्यानुसार गठित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय समितीमध्ये प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांसह दहा सदस्यांचा समावेश आहे.
शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या ७ एप्रिल रोजी निर्णयानुसार जिल्हा परिषदअंतर्गत प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत बदल्यांचे धोरण निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्हा परिषदअंतर्गत प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार जिल्हास्तरीय समिती गठित करण्यात आली आहे. या समितीमध्ये प्राथमिक शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, वरिष्ठ सहायक व इतर संबंधित कर्मचाऱ्यांसह दहा सदस्यांचा समावेश आहे. जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांच्या प्रक्रियेसाठी बदलीपात्र शिक्षकांची माहिती संकलित करणे, शिक्षकांच्या याद्या प्रसिध्द करणे, रिक्त पदांची माहिती घेणे, बदली प्रक्रियेसंदर्भात शिक्षकांचे प्रशिक्षण घेणे आदी प्रकारची कार्यवाही या जिल्हास्तरीय समितीकडून करण्यात येणार आहे.