लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : राज्य विज्ञान शिक्षण संस्था नागपूर, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान, मुंबई, जि.प. शिक्षण विभाग आणि जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळाच्यावतीने ४३ वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन व दुसर्या ग्रंथ महोत्सव (पुस्तक जत्रा) ९ ते ११ डिसेंबरदरम्यान भिकमचंद खंडेलवाल विद्यालय, डाबकी रोड येथे होणार आहे. यंदाच्या विज्ञान प्रदर्शनाचा मुख्य विषय ‘शाश्वत विकासासाठी नावीण्यपूर्ण उपक्रम’ हा राहणार असून, उपविषय आरोग्य आणि सुदृढ आरोग्य, संसाधन व्यवस्थापन व अन्न सुरक्षा, कचरा व्यवस्थापन आणि जलाशयाचे संरक्षण, वाहतूक व दळणवळण, डिजिटल व तांत्रिक समाधान, गणितीय प्रतिकृती आदी आहेत. या उपविषयांपैकी कोणत्याही एका उपविषयावर आधारित इ.६ ते ८ वी व इ. ९ ते १२ वीतील शालेय विद्यार्थ्यांकडून वस्तू प्रतिकृती, वैज्ञानिक प्रकल्प सादरीकरण होईल. ९ डिसेंबर रोजी सकाळी १0 वाजता पालकमंत्री डॉ. रणजित पाटील हे विज्ञान प्रदर्शन व ग्रंथ महोत्सवाचे उद्घाटन करतील. अध्यक्षस्थानी जि.प. अध्यक्ष संध्या वाघोडे राहतील. विशेष उपस्थिती महापौर विजय अग्रवाल, प्रमुख अतिथी म्हणून खा. संजय धोत्रे, आ. गोपीकिशन बाजोरिया, शिक्षक आ. श्रीकांत देशपांडे, आ. गोवर्धन शर्मा, आ. रणधीर सावरकर, तर स्वागताध्यक्ष म्हणून शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव गोपाल खंडेलवाल राहतील. विशेष अतिथी म्हणून जि.प. उपाध्यक्ष जमीर खान, शिक्षण सभापती पुंडलिकराव अरबट, शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्ष डॉ. तारा हातवळणे राहतील. ११ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता विज्ञान प्रदर्शन व ग्रंथ महोत्सवाचा समारोप होईल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प. सीईओ एस. रामामूर्ती राहतील. बक्षीस वितरण जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांचे हस्ते होईल. यावेळी पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, शिक्षण उपसंचालक चंदनसिंग राठोड, विद्या प्राधिकरणचा संचालक रविकांत देशपांडे, डॉ. पी.व्ही. जाधव राहतील. विज्ञान प्रदर्शनामध्ये विद्यार्थी, शिक्षकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद, प्रशांत दिग्रसकर, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष शत्रुघ्न बिरकड, शिक्षणाधिकारी वैशाली ठग, उपशिक्षणाधिकारी देवेंद्र अवचार, दिनेश तरोळे, विलास धनाडे, संध्या कांगटे, शिक्षण विस्तार दिनेश दुतंडे, गटशिक्षणाधिकारी रतनसिंग पवार, विज्ञान मंडळाचे अध्यक्ष रवींद्र भास्कर, विज्ञान पर्यवेक्षक अरूण शेगोकार, भिकमचंद खंडेलवाल विद्यालयाचे मुख्याध्यापक दिनकर इंगळे, मुख्याध्यापिका रसिका वाजगे, सुनील कराळे आदींनी केले.
ग्रंथ महोत्सवातील कार्यक्रम९ डिसेंबर रोजी सकाळी १0 वा. प्रदर्शनीय वस्तू नोंदणी व ग्रंथ, दुपारी १२ वा. ग्रंथदिंडी, परिसंवाद, नाट्य स्पर्धा, बचाव स्पर्धा, उद्घाटन, सायंकाळी ५ वा. प्रदर्शन पाहण्यासाठी खुले, सांस्कृतिक कार्यक्रम, १0 डिसेंबर रोजी सांस्कृतिक कार्यक्रम, आकाशगंगा, कथाकथन स्पर्धा, कविसंमेलन, साहित्यिकांची मुलाखत, प्रकट वाचन, सांस्कृतिक कार्यक्रम, ११ डिसेंबर रोजी वादविवाद स्पर्धा, काव्यवाचन स्पर्धा, म्हणी सादरीकरण स्पर्धा, रसरंग, बक्षीस वितरण आदी कार्यक्रम होतील.