अकोला : मागील चार दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे वातावरणात आर्द्रता निर्माण होऊन तापमानात घट झाली आहे. जिल्ह्याचा पारा ४० डिग्री सेल्सिअसच्या वर गेला होता. आता घट होऊन ३५.५ अंश सेल्सिअसवर आला आहे. पारा घसरल्याने शहरातील नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.
-------------------------------------------------------------
धुळीने वाहनधारक त्रस्त
अकोला : मूर्तिजापूर रस्त्यावरील महाबीज कार्यालय ते शिवणी रस्त्याचे काम प्रगतिपथावर आहे. या रस्त्याने प्रवास करताना धूळ उडत असल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहेत. या मार्गावरून जाताना ट्रक व मोठी वाहने वेगाने जात असल्याने छोट्या वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गावर उपाययोजना करून धुळीची समस्या मार्गी लावण्याची गरज आहे.
----------------------------------------------------------
मनपा अनुकंपाधारकांचे ५ एप्रिलपासून धरणे
अकोला : महानगरपालिकेमध्ये कार्यरत असताना मृत पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना २००८ पासून अद्यापपर्यंत नियुक्ती नाही. बऱ्याच कर्मचाऱ्यांच्या वारसांचे वय वाढत चालले आहे. नियुक्त्या होत नसल्याने ५ एप्रिलपासून धरणे आंदोलन करण्याचा इशारा महानगरपालिका अनुकंपाधारक नियुक्ती संघर्ष समितीचे पी. बी. भातकुले, अनुप खरारे यांनी मनपा आयुक्तांना दिलेल्या निवेदनात दिला.
-----------------------------------------------------------
‘रेल्वे तिकिटात सवलत द्या’
अकोला : राज्य शासन सामाजिक कार्यकर्त्यांना व्यसनमुक्ती क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्काराने सन्मानित करते. या पुरस्कार प्राप्त कार्यकर्त्यांना रेल्वे प्रवासात तिकिटांमध्ये कोणतीही सूट दिली जात नाही. या कार्यकर्त्यांना रेल्वे तिकिटात सवलत द्यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अशोक रामटेके यांनी रेल्वेमंत्र्यांना निवेदनाद्वारे केली आहे.