अकोला : जिल्हा दूध उत्पादक सहकारी संस्था महासंघाच्या निवडुणकांचा कार्यक्रम सहा महिन्यांत न लागल्याने सहा महिन्यांपूर्वी गठित करण्यात आलेली अशासकीय समिती निष्कासित करण्यात आली असून, त्या जागी ५ जून रोजी नवीन त्रिसदस्यीय प्राधिकृत अधिकारी समिती नेमण्यात आली आहे. या समितीच्या अध्यक्षस्थानी विभागीय उप निबंधक सहकारी संस्था (दुग्ध) हे स्वत: आहेत.दूध महासंघाच्या निवडणुकांमध्ये मागच्या दीड वर्षापूर्वी उमेदवारी अर्ज प्राप्त न झाल्याने निवडणुका रद्द झाल्या होत्या, तेव्हापासून दूध महासंघावर कधी अधिकारी तर कधी अशासकीय समिती काम बघत आहे. हा कार्यकाळ सहा महिन्यांचा आहे. या सहा महिन्यांत निवडणुका न लागल्यास सहा महिन्यांसाठी गठित करण्यात येत असलेली समिती निष्कासित केली जाते. त्यामुळे विभागीय उप निबंधक सहकारी संस्था (दुग्ध) यांनी ही समिती निष्कासित केली असून, त्या ठिकाणी त्रिसदस्यीय समिती गठित केली आहे. विशेष म्हणजे, ही समिती गठित करताना अध्यक्ष पद विभागीय उप निबंधक सहकारी संस्था (दुग्ध) एस. पी. कांबळे यांनी स्वत:कडे ठेवले आहे. या त्रिसदस्यीय प्राधिकृत अधिकारी समितीमध्ये समिती सदस्य म्हणून सहायक निबंधक सहकारी संस्था (पदूम) जी.जी. पवार अकोला, जिल्हा विशेष लेखा परीक्षक सहकारी संस्था (पदूम) सी.व्ही. साखरडोहे यांचा समावेश आहे.दरम्यान, महासंघावर प्राधिकृत अधिकारी समिती गठित झाल्यानंतर दूध उत्पादकांकडून वेळेवर दूध विक्री चुकारे करण्याची मागणी होत आहे.