अकोला : जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये पाचवी आणि आठवीचा वर्ग सुरू होणार आहे. दोन्ही मिळून ६११ वर्ग सुरू करण्यासोबतच ४४ वर्गखोल्या आणि २0७ शिक्षकांच्या पदांच्या प्रस्तावाला प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार यांनी शनिवारी मंजुरी दिली. तसे आदेश उद्या रविवारी जिल्हय़ातील सर्व मुख्याध्यापकांना दिले जाणार आहेत. बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम २00९ अंतर्गत शिक्षणाची सोय उपलब्ध करून देण्याचे शासनावर बंधनकारक आहे. त्यासाठी शासनाने २ जुलै २0१३ रोजीच इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळांना पाचवी आणि इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळांमध्ये इयत्ता आठवीचे वर्ग सुरू करण्याचे आदेश दिले, तसेच शिक्षण प्रणालीत इयत्ता पहिली ते पाचवी आणि इयत्ता सहावी ते आठवी अशी संरचना अस्तित्वात आली. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अस्तित्वात असलेल्या संरचनेत बदल करणेही आवश्यक झाले. त्यासाठी शासनाने निर्देश दिल्यानंतरही अंतराचा गोंधळ निर्माण झाला. त्यातून जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये इयत्ता पाचवी आणि आठवीचे वर्ग सुरू करण्यास विलंब झाला. जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीने ६ मार्च २0१७ रोजीच्या बैठकीत ठराव घेत ६१0 नवे वर्ग निर्माण करण्याला मंजुरी दिली. हा प्रस्ताव गेल्या दोन महिन्यांपासून तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण विधळे यांच्याकडे पडून होता. प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पवार यांच्याकडे फायलीबाबत निर्णय घेण्याची वेळ आली. त्यानुसार त्यांनी निकाल घोषित होण्याच्या आधीच वर्ग निर्मितीला मंजुरी दिली आहे.
जि. प. शाळांचे ६११ वर्ग सुरू होणार!
By admin | Published: April 30, 2017 3:13 AM