अकोला : जिल्हा नियोजन समितीची (डीपीसी) सभा सोमवार, २५ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. या सभेत जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेंतर्गत २०२१-२२ या आर्थिक वर्षातील विकासकामांच्या आराखड्यास मंजुरीसह निधी खर्चाचा आढावा घेण्यात येणार आहे.
पालकमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांच्या अध्यक्षतेखाली आणि जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत होणाऱ्या जिल्हा नियोजन समितीच्या सभेत २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेंतर्गत विकासकामांच्या आराखड्यास मंजुरी देण्यात येणार आहे. तसेच जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत डिसेंबर अखेरपर्यंत विकासकामांसाठी प्राप्त निधी व त्यामधून झालेला निधी खर्च यासंदर्भात आढावा घेण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, मनपा आयुक्त, जिल्हा नियोजन अधिकारी यांच्यासह विविध विभागप्रमुख या सभेला उपस्थित राहणार आहेत.