अकोला : मालमत्ता कराची लाखो रुपयांची थकबाकी मनपाकडे जमा न करणे एका मोबाईल टॉवर कंपनीच्या चांगलेच अंगलट आले. याप्रकरणी सोमवारी मनपाने टॉवरच्या लिलावाची प्रक्रिया पार पाडली.
शहराच्या विविध भागात उभारण्यात आलेल्या टॉवरद्वारे मोबाईल कंपन्यांची सुविधा पुरविली जाते. एकाच टॉवरच्या माध्यमातून अनेक मोबाईल कंपन्या ग्राहकांना सुविधा देतात. अर्थात, शहरात मोबाईल टॉवर उभारणीसाठी महापालिका प्रशासनाची परवानगी क्रमप्राप्त ठरते. यामध्ये मालमत्ता कर विभाग आणि नगररचना विभागाचा प्रामुख्याने समावेश आहे. अशा कंपनीने दरवर्षी मनपाकडे टॉवरचे नूतनीकरण करणे भाग आहे. तसे न करता कंपन्या सुविधा देत आहेत. नियमांचा भंग करून मालमत्ता कर थकीत ठेवणाऱ्या कंपन्यांविरोधात मनपाने कारवाईचा बडगा उगारला आहे. मालमत्ता कराचा भरणा करण्यास असमर्थ ठरलेल्या कंपनीच्या टॉवरचा लिलाव करण्याची प्रक्रिया सोमवारी पार पडली. यामध्ये आदर्श कॉलनी व हरिहरपेठ येथील टॉवरचा समावेश आहे. ही कारवाई मनपा उपायुक्त वैभव आवारे यांच्या मार्गदर्शनात कर अधीक्षक विजय पारतवार, सहा. कर अधीक्षक प्रशांत बोळे, गजानन घोंगे, मालमत्ता कर विभागाचे अभियंता महेंद्र जुनगडे, करवसुली लिपिक गोपाल लोखंडे, राजेंद्र पराते यांनी केली.
कंपनीकडे १२ लाखांची थकबाक़ी
आदर्श कॉलनी व हरिहरपेठ भागात मोबाईल टॉवर उभारणाऱ्या जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडे ३५ लाख रुपयांची थकबाक़ी आहे. आदर्श कॉलनी येथील टॉवरचे
२ लाख ५४ हजार रुपये आणि हरिहरपेठ येथील टॉवरचा १० लाख ५१ हजार रुपये कर थकीत आहे. हरिहरपेठ येथील लिलावात नागरिकांचा प्रतिसाद न मिळाल्यामुळे सदर ठिकाणची लिलाव प्रक्रिया तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे.