ग्रामसचिव पी. पी. चव्हाण यांनी लाखो रुपये निधीचा अपहार केल्याचे अहवालामध्ये निष्पन्न झाले आहे. सचिव पी. पी. चव्हाण यांनी ग्रामपंचायतीला मिळालेल्या लाखो रुपये निधीचा अपहार केल्याचा आरोप सायवणी येथील सामाजिक कार्यकर्ते विजयकुमार बळीराम ताले यांनी निवेदनातून केला होता. त्यांच्या तक्रारीवरून जिल्हा परिषद स्तरावर समिती गठित करून चौकशी करण्यात आली. सदर चौकशी अहवाल २०२० च्या ऑक्टोबर महिन्यामध्ये जिल्हा परिषद कार्यालयात सादर करण्यात आला होता. १० लाख ३४ हजार रुपयांचा अपहार केल्याचे अहवालामध्ये निष्पन्न झाले होते. परंतु कारवाई होत नसल्याने विजयकुमार ताले यांनी थेट सहायक आयुक्तांकडे तक्रार केली होती. सहायक आयुक्तांनी सुद्धा सीईओना पत्र दिले होते. त्यानंतर विजयकुमार ताले यांनी विभागीय आयुक्त पियुष सिंह यांची भेट घेऊन, सदर अहवालामध्ये निष्पन्न झालेल्या लाखोंच्या अपहाराबाबत चर्चा करून कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यांच्या मागणीची दखल घेत, विभागीय आयुक्तांनी ग्रामसचिवावर कारवाई करून सात दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहेत.
सात महिन्यांपर्यंत दडपला अहवाल
१३ ऑक्टोबर २०२० रोजी समिती गठित करून चौकशी करण्यात आली, चौकशी अहवाल तक्रारकर्त्याला देणे अपेक्षित होते. परंतु अहवालामध्ये सचिवाने लाखो रुपये निधीचा अपहार केल्याचे उघडकीस आल्याने सात महिन्यांपर्यंत अहवाल दडपण्यात आला. मात्र ताले यांनी सहायक आयुक्तांकडे तक्रार केली.