सिकलसेल जनजागृती मोहीम
अकोला: सिकलसेल जनजागृती सप्ताहांतर्गत शुक्रवार ११ डिसेंबरपासून जिल्ह्यात सिकलसेल जनजागृती आणि तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. ही मोहीम १६ डिसेंबरपर्यंत राबविण्यात येणार असून, ३० वर्ष वयोगाटातील युवक युवतींनी लग्नापूर्वीच सिकलसेलची चाचणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.
सुपर स्पेशालिटी रुग्णालयाला पदभरतीची प्रतीक्षा
अकोला: राज्यातील चारही सुपर स्पेशालिटी रुग्णालयासाठी पहिल्या टप्प्यात आवश्यक पद निर्मिती केली आहे. त्यामुळे अकोल्यातील सुपर स्पेशालिटी रुग्णालय सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. इमारतीचे बांधकामासह वीज जोडणीचे कार्यही पूर्ण झाले आहे; मात्र जोपर्यंत पद भरती केली जात नाही, तोपर्यंत रुग्णालय सुरू होणे शक्य नाही.
पावसाचा अंदाज, कापूस वेचणीचे आवाहन
अकोला: येत्या दोन ते तीन दिवसात जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अदाज असल्याने लवकरात लवकर कपाशीची स्वच्छ वेचणी करावी. तसेच वेचलेल्या कापसाची सुकलेल्या सुरक्षीत जागी साठवणूक करावी, असे आवाहन कृषी विद्यापीठातर्फे शेतकऱ्यांना करण्यात आले आहे.
प्रदूषणाचे प्रमाण वाढले
अकोला: कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे मार्च महिन्यानंतर सर्वत्र लॉकडाऊन लावण्यात आले होते. त्यामुळे उद्योगांसह वाहतूक व्यवस्था ठप्प पडली होती. परिणामी प्रदूषणात मोठ्या प्रमाणात कमी झाली होती; मात्र अनलॉकनंतर हळूहळू सर्वच व्यवहार पूर्ववत सुरू झाले. वाहतूकही मोठ्या प्रमाणात सुरू झाल्याने प्रदूषणाचे प्रमाणही वाढीस लागले आहे.
विजेच्या तारा लोंबकळल्या
अकोला: अकोला शहरातून बाहेरगावी जाताना अनेक भागात विजेच्या तारा लोंबकळल्याचे चित्र दिसून येते. हेच चित्र तेल्हारा, पातूर, बार्शीटाकळी तालुक्यातील विविध भागातही दिसून येते. या तारांमुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. संभाव्य अपघात टाळण्यासाठी महावितरणने लोंबकळलेल्या विजेच्या तारांची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
वन्य प्राण्यांचा वाढला हैदोस
अकोला: जिल्ह्यातील अकोट, तेल्हारा तालुक्यात सध्या रब्बीच्या हरभऱ्याचे पीक बहरले आहे; मात्र वन्य प्राणी मोठ्या प्रमाणात पीक फस्त करत आहेत. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. अनेक गावात शेतकरी रात्रीचे जागरण करून वन्य प्राण्यांपासून पिकांचे रक्षण करत आहेत. वातावरणातीबल बदल आणि वन्य प्राण्यांचा हैदोस यामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे.
अवजड वाहतूक ठरतेय धोक्याची
अकोला: मूर्तिजापूरमार्गे शहरात प्रवेश करणाऱ्या भरधाव जड वाहनांमुळे अपघाताचा धोका वाढला आहे. शहरातील मुख्य मार्गाचे निर्माण कार्य सुरू असल्याने अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी होते. अशातच शहरात प्रवेश करणाऱ्या भरधाव जड वाहनांमुळे गर्दीच्या ठिकाणी अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. वाहतूक शाखेच्या पोलिसांनी अशा वाहनांच्या वेगावर नियंत्रण लावण्याची गरज आहे.