अकोला: भूजल पातळीवर परिणाम होऊ नये, यासाठी लक्ष्यांकापेक्षा जास्त विहिरी मंजूर करू नये, असा निर्देश जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी गुरुवारी जिल्हय़ातील सातही पंचायत समितींच्या गटविकास अधिकार्यांना (बीडीओ) परिपत्रकाद्वारे दिले. शासनाच्या १७ डिसेंबर २0१२ रोजीच्या निर्णयानुसार विहिरींच्या कामांसाठी भूसर्वेक्षण आणि विकास यंत्रणेकडून अभिप्राय घेणे आवश्यक आहे. भूसर्वेक्षण आणि विकास यंत्रणेमार्फत मंजूर करण्यात आलेल्या लक्ष्यांकापेक्षा अधिक विहिरी मंजूर केल्यास भूजल पातळीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे लक्ष्यांकापेक्षा अधिक विहिरी मंजूर करण्यात येऊ नये, असे निर्देश जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी जिल्हय़ातील अकोला, आकोट, बाश्रीटाकळी, बाळापूर, पातूर, तेल्हारा व मूर्तिजापूर या सातही पंचायत समितींच्या गटविकास अधिकार्यांना परिपत्रकाद्वारे दिले. लक्ष्यांकापेक्षा अधिक विहिरी मंजूर केल्यास संबंधित अभियंता व गटविकास अधिकारी जबाबदार राहतील आणि यासंदर्भात त्यांच्याविरुद्ध कार्यवाही करण्यात येणार असल्याचा इशाराही जिल्हाधिकार्यांनी जारी केलेल्या परिपत्रकात देण्यात आला आहे.
लक्ष्यांकापेक्षा जास्त विहिरी मंजूर करू नका!
By admin | Published: March 07, 2016 2:41 AM