लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: धर्माच्या नावावर राजकारणासाठी वापर होणार नाही, याबाबत विचार करून, ‘ओबीसीं’नी न्याय हक्कासाठी लढण्याचा संकल्प करावा, असे आवाहन भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड. प्रकाश उपाख्य बाळासाहेब आंबेडकर यांनी सोमवारी येथे केले.ओबीसी महासंघाच्यावतीने अकोल्यातील स्वराज्य भवन प्रांगणात आयोजित ओबीसी मेळावा व समाजभूषण वितरण समारंभात ते बोलत होते. अँड. संतोष रहाटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला स्वागताध्यक्ष बालमुकुंद भिरड व प्रमुख अतिथी म्हणून आमदार बळीराम सिरस्कार, माजी आमदार हरिदास भदे, माजी मंत्री डॉ. दशरथ भांडे, भारिप-बमसंचे जिल्हा कार्याध्यक्ष काशीराम साबळे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष प्रतिभा अवचार, जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे, उपाध्यक्ष जमीरउल्लाखा पठाण, डी.एन. खंडारे, देवका पातोंड, प्रा. धैर्यवर्धन पुंडकर, किरण बोराखडे, अँड. धनश्री देव, भाऊराव अंबाळकर, हिरासिंग राठोड, डॉ. हर्षवर्धन मालोकार, डॉ. रहेमान खान, आसीफ खान, प्रदीप वानखडे, अनुराधा दोड, सुभाष रौंदळे, सतीश बाबर, सम्राट डोंगरदिवे, मंगला तितुर, डॉ. वसंत मुरळ, आशा एखे, आशा इंगळे, गोपाल लांडे, संजय आष्टीकर, श्रीकांत खोने उपस्थित होते.आरक्षणासाठी देशभर लढा झाल्यानंतर सत्तेत बदल झाला. त्यामध्ये ओबीसींना २७ टक्के आरक्षण मिळाल्याचे सांगत, ओबीसींना २२ लाख नोकर्यांपैकी ११ लाख नोकर्या मिळाल्या असून, उर्वरित नोकर्या मिळणे अद्याप बाकी असल्याचे अँड. आंबेडकर म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेवर टीका करीत, सत्तेवर आल्यानंतर ओबीसींचे शिक्षण कसे काढून घेता येईल, याचेच राजकारण सुरू आहे. ओबीसी विद्यार्थ्यांची ५४0 कोटींची शिष्यवृत्ती सरकारने ५८ कोटींवर आणली, हे ५८ कोटी कोणाला पुरतील, याचे उत्तर आता ओबीसींनीच दिले पाहिजे, असे अँड. आंबेडकर यांनी सांगितले. ओबीसींनी सत्ता हस्तगत करून नवीन व्यवस्था निर्माण करावी, तरच मानाने व सन्मानाने जगता येईल, हे समजून घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
उद्देश, स्वप्न व संकल्पना नसेल तर आम्ही काहीही करू शकणार नाही आणि नवीन व्यवस्था निर्माण केल्याशिवाय आयुष्यात बदल होणार नाही, असे सांगत ज्या हिंदुत्ववाद्यांनी सत्ता ताब्यात घेतली, त्यांच्याकडे दया नसल्याचे त्यांनी सिद्ध केले, असा आरोप अँड.आंबेडकरांनी केला. संतांच्या शिकवणुकीत दानाला महत्त्व असून, देवळातल्या दानाचा वाटा ओबीसींना मिळत नाही, तर सत्तेत वाटा काय मिळणार, असा सवाल उपस्थित करीत, यापुढे धर्माच्या नावावर राजकारणासाठी वापर होणार नाही, यासंदर्भात विचार करून न्याय्य -हक्कासाठी लढण्याचा ओबीसींनी संकल्प करावा, असे आवाहनही अँड.आंबेडकर यांनी केले. या मेळाव्यात ‘ओबीसीं’मधील विविध समाजघटकातील उल्लेखनीय कार्य करणार्या ३५ जणांना समाजभूषण पुरस्काराचे वितरण अँड.आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वागताध्यक्ष बालमुकुंद भिरड, संचालन सुवर्णा जाधव व शाहू भगत यांनी तर आभार सम्राट डोंगरदिवे यांनी मानले. मेळाव्याला जिल्ह्यातील ओबीसी बांधव उपस्थित होते.
हा तर धार्मिक उन्माद; लोकशाही खिळखिळी करण्याचे नाटक !धर्माच्या राजकारणात देशभरात अनियंत्रित हिंदू संघटना निर्माण झाल्या असून, अनियंत्रित आणि असंघटीत संघटनांमध्ये सुरू असलेली लढाई हा धार्मिक उन्माद असून, यासंदर्भात प्रवीण तोगडिया यांनी केलेल्या वक्तव्याचा उल्लेख अँड.आंबेडकर यांनी यावेळी केला. ‘पद्मावत’चित्रपटाच्या मुद्दयावर करनी सेनेच्या भूमिकेचा उल्लेख करीत, ‘आम्ही म्हणतो ते ऐका’ अशी भूमिका घेण्यात येत असल्याच्या परिस्थितीत लोकशाही व्यवस्थेला खिळखिळी करण्याचे नाटक सध्या सुरू आहे; मात्र यासंदर्भात सरकार कोणतीही कारवाई करत नसल्याचा आरोपही अँड.आंबेडकर यांनी केला.
हिंदू संघटनांमध्ये कुरघोडी; धर्माचा भस्मासूर ‘आरएसएस’लाही खाणार!करनी सेना, संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे हे एकाच माळेचे मणी असून, त्यांना त्यांचेच राज्य निर्माण करायचे आहे. त्यासाठी असंघटीत हिंदू संघटनांमध्ये कुरघोडी सुरू झाली आहे. यासंदर्भात प्रवीण तोगडिया यांचे उदाहरण देत, धर्माचा हा भस्मासूर ‘आरएसएस’लाही खाणार असल्याचे अँड.आंबेडकर यांनी यावेळी स्पष्ट केले. कोरेगाव भीमा प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला हात घालण्यास सरकार अद्याप तयार नाही, या मुद्यावर ज्या दिवशी आम्ही ठरवू त्या दिवशी हे सरकार उलथून पाडल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही आंबेडकर यांनी दिला.
शेतकरी पुढार्यांनीच स्पर्धक निर्माण केला!देशातील शेतकरी प्रचंड अडचणीत असल्याचे सांगत, पूर्वी देशाची बाजारपेठ शेतकर्यांसाठी आरक्षित होती.आता परदेशातील शेतकरी येतो आणि देशात माल विकून जातो. त्यामुळे शेतकरी व शेतकरी पुढार्यांनी स्वत:च स्पर्धक निर्माण केल्याचे अँड. आंबेडकर यांनी सांगितले.