अकोला : आपण सर्व कर देवता आहात आणि आम्ही सेवक आहोत, त्यामुळे जीएसटीसंदर्भात ज्या काही शंका असतील, त्याबाबत विचारा. जीएसटीच्या ३६ रिटर्न भरण्यास मुळीच घाबरू नका. ही बाब तुमच्यासाठी भविष्यात सोयिस्कर राहील, या शब्दांत विक्री कर अधिकारी रमेश दळवी यांनी आवाहन केले. विदर्भ चेंबर्स आॅफ कॉमर्सतर्फे आयोजित जीएसटीच्या कार्यशाळेत ते बोलत होते. या कार्यशाळेला अकोल्यातील व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.आगामी १७ मे १७ रोजी राज्य शासन जीएसटीच्या विधेयकास मंजुरी देणार असून, १ जुलैपासून देशभरात जीएसटी लागू होत आहे. जीएसटीबाबत असलेला व्यापाऱ्यांच्या मनातील संभ्रम दूर करण्यासाठी आणि जीएसटीचे फायदे समजून सांगण्यासाठी राज्यासह अकोल्यातील प्रत्येक तालुक्यात आता विक्री कर विभागातर्फे कार्यशाळा होत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून बुधवारी श्रावगी टॉवर्समधील चेंबर्सच्या कार्यालयात ही कार्यशाळा पार पडली. सुरुवातीला पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे मार्गदर्शन करण्यात आले. विक्री कर अधिकारी विजयालक्ष्मी तायडे यांनी मार्गदर्शन केले. जीएसटीचे फायदे काय, रेट आॅफ टॅक्स कसा कमी होईल, याची उदाहरणासह माहिती येथे देण्यात आली. कर आकरणीतील टक्केवारी कशी राहील, २० लाख रुपयांपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या व्यापाऱ्यांनी जीएसटीचे रजिस्ट्रेशन करणे गरजेचे आहे. आॅनलाइन सीस्टिम असल्याने कर थांबविणाऱ्यांची माहिती तातडीने लक्षात येणार आहे. तशाप्रकारचे सॉफ्टवेअर तयार केले गेले असल्याची माहितीही येथे देण्यात आली. एसजीएसटी एका राज्यातून-दुसऱ्या राज्यातील व्यवहारासाठी, सीजीएसटी राज्यातून केंद्राच्या व्यवहारासाठी आणि आयजीएसटी संपूर्ण व्यवहारासाठी राहणार असल्याचेही येथे सांगितले गेले आहे. दर महिन्याच्या रिटर्न भरण्याचा बाऊ करू नका, असे आवाहनही येथे केले गेले. क्रेडिट न भरणाऱ्यांची माहिती लगेच कळणार आहे, असेही येथे सांगितले गेले. विक्री कर उपायुक्त सुरेश शेंडगे, आनंद गावंडे, रवींद्र गावंडे, अभिजित नागले, अंशुल सरोदे, जयश्री खंडागळे, श्रीकांत थोरात, नीलेश चव्हाण, केंद्रीय उत्पादन शुल्काचे बेग, निरीक्षक साखरे, चेंबर्सचे अध्यक्ष विजय पनपालिया, उपाध्यक्ष राजकुमार बिलाला, सचिव निकेश गुप्ता, अशोक डालमिया, दिलाप खत्री, किराणा मर्चंटचे कासम अली, विक्री कर समितीचे अॅड. गिरीष धाबलिया, अॅड. धनंजय पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.महापालिका आकारणार लोकल टॅक्सजकात, एलबीटीप्रमाणे लोकल टॅक्सही महापालिका व्यापाऱ्यांवर लादणार आहे. त्यांना रिटर्नचे फायदे मिळू शकतील, अशी माहितीही येथे देण्यात आली. आता अकोला महापालिकेला नव्याने यंत्रणा उभारावी लागणार आहे.
जीएसटीचे ३६ रिटर्न भरण्यास घाबरू नका!
By admin | Published: April 27, 2017 1:24 AM