अकोला : जिल्ह्यात गत २३ महिने जिल्हाधिकारी म्हणून काम करताना शासनाच्या योजना अधिक लोकाभिमूख कशा करता येतील, याचा प्रयत्न केला. प्रत्येकाची काम करण्याची वेगळी ‘स्टाईल’ असते. माझीही एक वेगळी स्टाईल आहे. जिल्ह्याचा दंडाधिकारी असतानाही आपण कधीही ‘टीपीकल’ अधिकारी म्हणून वागलो नाही, असे मनोगत मावळते जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी सोमवारी येथे व्यक्त केले.पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेअंतर्गत जिल्ह्यातील तीन तालुक्यांमध्ये सुरु असलेल्या कामांची माहिती देण्यासाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत बातमीदारांशी औपचारिक संवाद साधताना मावळते जिल्हाधिकारी बोलत होते. गत दोन वर्षांपूर्वी अकोल्याचे जिल्हाधिकारी म्हणून रुजू झालेल्या जी. श्रीकांत यांची नांदेड येथे जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली आहे. त्यांची जिल्ह्यातील कारकिर्द खुपच चर्चेची राहिली. याबाबत बोलताना जी. श्रीकांत म्हणाले, ‘‘अकोल्यात आल्यानंतर मी शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न केला. शासनाच्या योजना लोकाभिमूख व्हाव्या, यासाठी त्यांची जाहीरात करणे गरजेचे असते. या योजनो लोकांपर्यंत पोहचाव्या यासाठी मी वेगळ्या पद्धतीने काम केले. याला पब्लिसिटी स्टंट असे म्हटल्या गेले, असले तरी त्यात मला काही वावगे वाटत नाही. मी स्वत:च्या फायद्यासाठी कधीही पब्लिसिटी स्टंट केला नाही. चौकट मोडून काम करणे ही माझी स्टाईल आहे. मी टिपिकल अधिकारी म्हणून वागलो नाही व यापुढेही वागणार नाही.’’ काम करताना काही निर्णय घ्यावे लागतात. जास्त-जास्त लोकांचा फायदा व्हावा, असे निर्णय आपण घेतल्याचेही जी. श्रीकांत यावेळी म्हणाले. पत्रकार परिषदेला उपजिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे (रोहयो) यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.महाराष्ट्र दिनी महाश्रमदानजिल्ह्यातील तीन तालुक्यांमध्ये वॉटर कप स्पर्धेअंतर्गत सुरु असलेल्या जलसंधारणाच्या कामांत अनेक जण श्रमदान करीत आहेत. यामध्ये आपणही श्रमदान करावे, अशी अनेकांची इच्छा आहे. यासाठी येत्या १ मे या महाराष्ट्र दिनी आकोट तालुक्यातील उमरा व आसेगाव बाजार येथे महाश्रमदान हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. विभागातील हा पहिलाच प्रयोग असून, जिल्ह्यातील नागरिक या दोन गावांमध्ये जाऊन श्रमदान करू शकतात. आयुष्यातील दोन तास श्रमदान असे या उपक्रमाचे घोषवाक्य असल्याची माहिती तालुका समन्वयक समाधान वानखडे, संघपाल वाहुरवाघ, सुभाष नानोटे, प्रफुल्ल कोल्हे, नरेंद्र काकड यांनी दिली. या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.
‘टीपीकल’ अधिकारी म्हणून वागलो नाही - जी. श्रीकांत
By admin | Published: April 24, 2017 8:58 PM