नीलिमा शिंगणे-जगड । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : केळीवेळी गावाला कबड्डीचे माहेरघर अशी ओळख प्राप्त झालेली आहे. ३0 वर्षांच्या कार्यकाळात राज्यभर फिरत असताना, खेडे गावात कबड्डीसाठी एवढे मोठे स्टेडिअम निर्माण झालेले कुठे पाहिले नाही. परंतु आज केळीवेळीसारख्या छोट्या गावात भव्य कबड्डीचं स्टेडिअम पहिल्यांदा पाहतो आहे. केळीवेळीचा आदर्श महाराष्ट्राने घ्यावा, असे हे गाव आहे. पुढल्या महिन्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत केळीवेळीच्या कबड्डीची दखल घेऊन गावाला क्रीडाच्या सर्व भौतिक सुविधा उपलब्ध करू न देऊ, अशी ग्वाही वस्त्रोद्योग, पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्य व्यवसाय राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी दिली.श्री हनुमान क्रीडा प्रसारक व बहूद्देशीय मंडळ, केळीवेळीच्यावतीने मंडळाच्या ७५ व्या वर्षानिमित्त हीरक महोत्सवाचे आयोजन केले आहे. याअंतर्गत आयोजित खासदार चषक अखिल भारतीय कबड्डी स्पर्धा-२0१८ च्या उद्घाटनप्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. केळीवेळीतील हनुमान क्रीडा मंडळ मैदानावर गुरुवारी रात्री स्पर्धेचे उद्घाटन झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार बबनराव चौधरी होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून माजी राज्यमंत्री रामदास बोडखे, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर, माजी आमदार डॉ. जगन्नाथ ढोणे, अर्जुन पुरस्कारप्राप्त विजय जाधव, युवा काँग्रेस नेते महेश गणगणे, विदर्भ कबड्डी फेडरेशनचे सचिव जितू ठाकूर, प्राचार्य मधुकर पवार, प्रा. मुकुंद खुपसे, दिनकर गावंडे, डॉ. शैलश देशमुख, सतीश डफाळे, वासुदेव नेरकर, दिलीप आसरे, गणेश पोटे, संतोष अनासने उपस्थित होते. प्रास्ताविक माजी आमदार गजानन दाळू गुरुजी यांनी केले. यानंतर उद्घाटनिय सामना अकोला व बारामती संघात झाला. खोतकर यांनी पुढे बोलताना अकोला पायलट जिल्हा म्हणून निवडल्या जाईल. परंतु, यासाठी प्रस्ताव त्वरित पाठवावा, पूर्वी राखीव लोकांनाच गायी-बकर्यांचे वाटप केले जात होते. आता मात्र जो व्यक्ती अर्ज करेल, अशा सर्वांना गायी, बकर्यांचे वाटप केले जाईल, असे सांगितले.
दीपक शिर्के यांची दमदार एन्ट्रीचित्रपट अभिनेते दीपक शिर्के उद्घाटन कार्यक्रमाचे विशेष आकर्षण होते. तिरंगा, दाग, चित, सरकार, हम, इश्क या हिंदी चित्रपटात दमदार अभिनय करणारे दीपक शिर्के यांना प्रत्यक्ष पाहण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिकांनी गर्दी केली होती. दीपक शिर्के यांची मैदानात दमदार एन्ट्री होताच चाहत्यांनी त्यांच्या भोवती गराडा घातला. अनेक चाहत्यांनी त्यांना कॅमेराबद्ध केले, तर काहींनी सेल्फी काढली.