अकोला, दि. १३ : कोपर्डी घटनेच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाचे प्रत्येक जिल्हह्यात मूक मोर्चे निघत आहेत. जसा आपल्याला मोर्चा काढण्याचा अधिकार आहे, तसा तो मराठा समाजाचाही कायदेशीर हक्क आहे. आपल्या मागण्यांसाठी शांततामय मार्गाने काढण्याचा हक्क राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वांना दिला आहे. त्या विरोधात आंबेडकरी समाजाने प्रतिमोर्चे काढण्याची गरज नाही असे आवाहन भारिप बमसंचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड.प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. अँड.आंबेडकर यांच्या वतिने जिल्हा प्रसिद्धी प्रमुख डॉ. प्रसन्नजित गवई यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की मराठा समाजाचे हे महामोर्चे सरकारच्या विरोधात आहेत. आजवर ठिकठिकाणी निघालेल्या मोर्चांच्या विरोधात आंबेडकरी एससी, एसटी समाजात प्रतिरोधक प्रतिक्रिया उमटत नसल्याचे पाहून मराठा मोर्चाला शह देण्यासाठी आंबेडकरी-दलित-आदिवासी समाजात आरएसएस मोठा गैरसमज पसरवित आहे. याला आंबेडकरी एससी, एसटी समाजाने बळी पडू नये, असे आवाहन आंबेडकर यांनी केले. देशात अनेक राज्यांत आंबेडकरी, दलित, आदिवासी आणि मुस्लीम समाजातील लोकांवर अनेक अन्याय, अत्याचाराच्या घटना घडत आहेत. या पार्श्वभूमीवर देशातील भारिप बहुजन महासंघ, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्षाशी संबंधित दलित शोषण मुक्ती मंच, भारतीय शेत मजदूर युनियन, नॅशनल कॅम्पेन कौन्सिल फॉर प्रोटेक्शन ऑफ दलित राईट्स आणि विविध समतावादी, परिवर्तनवादी संघटनांच्या पुढाकाराने देशपातळीवर ह्यदलित स्वाभिमानी संघर्ष मंचह्णच्यावतीने १६ सप्टेंबर रोजी दिल्ली येथे जंतरमंतरवर प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात निदर्शन करण्यात येणार आहे, असे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख डॉ. प्रसन्नजित गवई यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.
मराठा मोर्चांच्या विरोधात प्रतिमोर्चे काढू नका- आंबेडकर
By admin | Published: September 14, 2016 1:59 AM