अकोला: अलीकडच्या काळात वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे. युवक तर सुसाट वाहने दामटताना दिसतात. पोलीस वाहतूक नियमांबाबत जनजागृती करतात; परंतु अनेक वाहन चालक त्याकडे दुर्लक्ष करतात. पालकही मुलांच्या हाती दुचाकी देतात. हे चुकीचे असल्याचे मत व्यक्त करीत, वाहतूक नियमांचे उल्लंघन करून स्वत:चा जीव धोक्यात घालू नका, घरी आपली कोणीतरी वाट पाहतात, याचे भान असू द्या, अशा शब्दात आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी आवाहन केले.पोलीस दलाच्यावतीने ४ जानेवारी रोजी प्रमिलाताई ओक सभागृहात वाहतूक सजगता मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. त्यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून महापौर विजय अग्रवाल, मनपा आयुक्त संजय कापडणीस, पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जिचकार, शहर पोलीस उपअधीक्षक उमेश माने, परिविक्षाधीन सहायक पोलीस अधीक्षक गौरव भांबरे, परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक नीलेश देशमुख आदी उपस्थित होते. कार्यक्रमाला डॉ. मानसा कलासागर यांचीही विशेष उपस्थिती होती.त्यावेळी महापौर विजय अग्रवाल यांनी वाहतूक पोलिसांसाठी तयार करण्यात आलेल्या चौकींचे उद्घाटन करण्यात केले. कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते वाहतूक सजगता मोहिमेच्या पोस्टरचे प्रकाशन करण्यात आले. त्यावेळी ‘जंबुरे का खेल’ पथनाट्य नीलेश गाडगे, संजय भगत, योगेश जऊळकार, राहुल तायडे, गजानन केदारे, नम्रता लाड, पूजा पालिवाल, भाग्यश्री मेसरे, संजीवनी नागरे, श्रीकांत तळोकार व कार्तिक काळे यांच्या चमूने सादर करून उपस्थितांना वाहतुकीचे नियम पाळण्याचा संदेश दिला. त्यावेळी महापौर विजय अग्रवाल, पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी वाहतुकीचे नियम पाळण्याचे आवाहन केले. कार्यक्रमामध्ये वाहतूक नियंत्रण शाखेचे प्रमुख विलास पाटील यांच्यासह मुन्ना ठाकूर, मनोज ठाकूर, उमेश इंगळे, पद्मसिंग बैस, नीता संके, अश्विनी माने, पूजा दांडगे व दीपाली नारनवरे या कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यात आले.
विद्यार्थ्यांसाठी रंगभरण स्पर्धापोलीस दलातर्फे पोलीस मुख्यालय येथे ७ जानेवारी रोजी विद्यार्थ्यांसाठी रंगभरण स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेत जिल्ह्यातील सर्व शाळा, कॉलेज, शिकवणी वर्गामधील विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, तसेच विद्यार्थी व पालकांना वाहतूक नियमांची माहिती देऊन जनजागृती करण्यात येणार आहे. हेल्मेटबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने सोमवारी हेल्मेट रॅलीसुद्धा काढण्यात येणार आहे.
दरवर्षी होतात पाच लाख अपघात!भारतात दरवर्षी पाच लाख रस्ते अपघात घडतात. २0१६ च्या अहवालानुसार या अपघातांमध्ये १.५१ लाख लोकांचा मृत्यू होतो. पाच लाख लोकांना दिव्यांगत्व येते. सर्वाधिक २३.९ टक्के अपघात हे दुचाकीमुळे होतात.